quick commerce
Esakal
प्राची गावस्कर
ई-कॉमर्स कंपन्यांची पुढची भरारी म्हणजे क्विक कॉमर्स. अर्थात तुम्हाला हवी असलेली वस्तू, तुम्ही ऑर्डर दिल्यापासून अक्षरश: दहा मिनिटे ते अर्ध्या तासात दारात हजर होते. मग यांना अल्लादिनचा जिन म्हणावं नाही तर काय!
‘अगंबाई, भाजीला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर पार संपली आहे. आता काय करू? खाली उतरून दुकानात जाऊन आणायला वेळही नाही आणि कंटाळाही आलाय.’ लगेच ई-पिढीला साद घातली आणि म्हटलं, ‘त्या मोबाईलमधल्या ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, बिग बास्केट किंवा आणखी कोण असेल त्या अल्लादिनच्या जिनला सांग गं... कोथिंबीर आणायला... मी बाकीचं करेपर्यंत येईलही तो...’ आणि अक्षरशः आठव्या मिनिटाला एक पोरगा दारात हिरवीगार कोथिंबीर घेऊन उभा राहिला. ही अशी सुविधा सुरू झाल्यापासून आता मनात आलेला पदार्थ, त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत की नाहीत हे न बघता करण्याची हिंमत वाढली आहे. एवढंच नाही, कोणाला काही भेट द्यायची असेल आणि वेळ नसेल तर मी अल्लादिनच्या जिनला साद घालते आणि तो येतोही धावत... हे अक्षरशः एक सुख झालं आहे... तंत्रज्ञानाने ही जादू घडवली आहे.... चुटकीसरशी वस्तू दारात हजार होतात... क्विक कॉमर्स का जबाब नही!