

Monsoon Songs Literature
esakal
शंतनु वेल्हाळ
पाऊस म्हणजे निसर्गाचा स्वर, कविता म्हणजे मनाचा स्वर आणि गाणं म्हणजे त्या दोघांच्या मिलाफातून जन्मलेली लय. या तिघांचं नातं इतकं सहज, इतकं नैसर्गिक आहे की त्याला वेगळं करणं अशक्य आहे. आणि म्हणूनच खिडकीबाहेर सरी कोसळत असताना, एखाद्या जुन्या कवितेची ओळ किंवा एखाद्या गीताचा स्वर कानात अलगद तरळला की जाणवतं की पाऊस बाहेर पडत नाही, तो आत उतरत असतो.
पाऊस हे केवळ ढगातून पडणारं पाणी नाही, ती एक भावावस्था आहे. तो माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या आठवणींना जागं करणारा, विस्मृतीच्या धुळीत गाडलेल्या संवेदनांना पुन्हा ओल देणारा एक अदृश्य स्पर्श असतो. उन्हाळ्याच्या रखरखाटानंतर पहिला पाऊस जेव्हा भूमीला स्पर्श करतो, तेव्हा मातीचा सुगंध जसा दरवळतो, तसाच काहीसा शब्दांचाही सुगंध मनात दाटून येतो. म्हणूनच पावसाचं आणि कवितेचं नातं जन्मजात आहे, आणि मराठी माणसासाठी हे नातं अधिकच गहिरं आहे. कारण आपल्या साहित्याच्या आणि संगीताच्या परंपरेत पावसानं नेहमीच एक विशेष स्थान व्यापलेलं आहे.