

Block Printing
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
ब्लॉक प्रिंटिंग हस्तकलेत जो मानवी स्पर्श आहे, तो यंत्रानं केल्या जाणाऱ्या छपाईमध्ये नाही. यंत्रामुळे अचूक एकसारखेपणा येत असला, तरी त्यात पोत आणि भावना उमटत नाहीत. मानवी हातांमुळे येणारी किंचित अनियमितता आणि एकावर एक उमटणारे रंग त्या वस्त्राला जो जिवंतपणा देतात, तो यांत्रिक छपाईमध्ये दिसत नाही. म्हणून ब्लॉक प्रिंटिंगचा प्रत्येक नमुना वेगळा असतो; एकासारखा दुसरा कधीच नसतो.
भारतात वस्त्रकलेची परंपरा खूप प्राचीन आहे. वस्त्रांवर केलं जाणारं भरतकाम किंवा छपाई यांचाही वारसा प्रदीर्घ आहे. राजस्थानमधली ब्लॉक प्रिंटिंगची हस्तकला ही भारतीय वस्त्रकलेला उठाव देणारी व तिचं सौंदर्य वाढवणारी कला आहे. यात छपाईसाठी लाकडी ठोकळ्यांचा वापर केला जातो. कारागीर लाकडी ठोकळे हातानं तयार करून त्यावर वेगवेगळे आकृतिबंध कोरून काढतात आणि मग नैसर्गिक रंगांच्या मदतीनं कापडावर छपाई केली जाते. हातानं ब्लॉक प्रिंटिंग केलेली ही पारंपरिक भारतीय वस्त्रं आता जगभरात लोकप्रिय आहेत.
हँड ब्लॉक प्रिंटिंगचा इतिहास बघितला, तर ही कला चीनमध्ये उगम पावली असल्याचं सांगितलं जातं. हळूहळू ती जगात इतर ठिकाणी पोहोचली. विशेषतः पूर्व आशियामध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. अर्थात उपलब्ध असलेल्या सर्वात प्राचीन नोंदी सांगतात, की ब्लॉक प्रिंटिंगची सुरुवात कापडाच्या आधी कागदापासून झाली. डायमंड सूत्र हे चिनी पुस्तक इसवी सन ८६८मध्ये ब्लॉक प्रिंटिंग तंत्रानं छापलं गेलं होतं. आता हे पुस्तक ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. काही अभ्यासकांच्या मते, ही कला तुर्कस्तान किंवा पर्शियाबरोबरच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून भारतात पोहोचली असण्याची शक्यता आहे. पण भारतीय कारागिरांनी इथले रंग, प्रतीकं आणि स्थानिक समुदायांच्या संस्कृतीशी सांगड घालत तिचं रूपांतर एका अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि संपन्न हस्तकलेत केलं आहे.