

Indian Sculptor
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
राजेंदर टिकू हे दगडामध्ये शिल्प कोरणारे कलावंत, कलेच्या विविध माध्यमात काम केले तरी ते ते दगडातून मूर्ती कोरताना अधिक प्रसन्न असतात.
काश्मीरमध्ये शिक्षण घेतलेल्या टिकू यांना इब्राहिम अल्काझी यांचा सहवास मिळाला त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलले. परंपरा ही काही अनुकरण करण्यासाठी नसते तर ती नीट समजून घेऊन पुढे नेण्यासाठी असते असे टिकू मानतात.
राजेंदर टिकू हे शिल्पकार आहेत पण शिळेला आकार द्यायचा तो फक्त हातातल्या साहित्याला नव्हे तर एकूण संस्कृतीच्या भविष्य घडवण्यासाठी आणि तेही वर्तमानाचे पूर्णपणे अवधान राखून असे ते मानतात. ते सांगतात की दगडालाही स्मरणशक्ती असते हे गृहीत धरून. शिल्पकलेकडे पाहण्याचा हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. त्यांचे स्वतःचे आयुष्यच मुळी ऐतिहासिक घटना, निसर्ग आणि परंपरा यांनी घडवलेले आहे अशांनाच असे शक्य होते.
त्यांचा जन्म झाला काश्मीरमधील वाडवान या खेड्यात. बालपण गेले तो परिसर आज पाहता आपल्याला स्वर्गच वाटतो. शिकायला शाळा होतीच. परंतु त्यांच्यावरील बरेचसे संस्कार आजूबाजूच्या परिसरातील घटनांमुळे होत असत. ‘मला शिक्षण काही वर्गात बसून मिळालं नाही, तर ते इकडून तिकडून मिळत होतं,’ ते सांगतात. या इतर जगात खेड्यातील दर्गाही सामील होती. त्या ठिकाणी पर्शियन शैलीतील भित्तिचित्र होती. ती रंगवली होती आणि काही पुनर्जीवित केली जात. पर्शियन कुटुंबातील सभासदांकडून. लहान मुलांच्या कुतूहलाने त्या कारागिरांच्या जवळ उभे राहत आणि रंग, ब्रश, चित्रे काढण्याचे तंत्र याबद्दल नको तितके प्रश्न विचारत. लग्नाच्या मोसमात हिंदूंच्या घरात समोरच्या बाजूला अनेक देखावे रंगवले जात. यातच काहीही शेजाऱ्यांनी टिकू याला रंगवायला सांगितले. आर्ट स्कूलमध्ये पोहोचण्यापूर्वीच नकळत त्यांच्या आयुष्यात कलेचा प्रवेश झाला होता.