मनोहर मंडवाले
पाइनच्या झाडांच्या सुंदर प्रतिमांचे कोलाज तयार करणारा तो गूढ सावल्यांचा खेळ कौसानीपेक्षा रानीखेतमध्ये मला जास्तच मनमोहक वाटला. इतका की त्या वाटांवरून नुसतं चाललं, तरी मनात तरल भावभावनांचे पेव फुटत होते. वाटलं, जीवलगाच्या हातात हात गुंफून आपण अंबरातून विहारतोय आणि समोरचं निळं निळं आभाळ आपल्या पावलांसोबत पुढे पुढे सरकतंय! एवढ्यात वाऱ्याची एक जोरदार झुळूक शेकडो वाळक्या पानांना उचलून दूरवर भिरकावती झाली.
मनाला उगाचच खेद वाटतोय मित्रहो, की माझ्या डोळ्यांत भरून असलेला अनवट, अवर्णनीय असा उत्तराखंड मी तुमच्यासोबत फक्त शब्द आणि चित्रांतूनच शेअर करू शकतोय! किती अन् काय बोलू त्याच्या अकल्पनातीत सौंदर्याबद्दल? कसं सांगू, सफरचंदाच्या झाडाला नखशिखांत डवरून आलेल्या त्या सुंदर सुंदर इवल्या गुलाबी फुलांच्या कोमलतेबद्दल? पाइनच्या झाडांवर एखाद्या घंटेसारखी लगडलेली ती चीर पाइनची फुलं? का त्यांचीच बीजं? स्वतःत मश्गुल असलेल्या त्या नागमोडी वाटा, डोंगरउतारावर वसलेली ती रंगबेरंगी टुमदार घरं, वळणदार रस्त्यारस्त्यांना खुलवणारी उंचच उंच पाइनच्या झाडांची भरगच्च मांदियाळी, प्लम ब्लॉसमच्या त्या इवल्या इवल्या फिक्कट गुलाबी नाजूक कळ्या?... इतका क्लासिक, अस्पर्शित अन् निःस्तब्ध होता ना तो अवघा परिसर, की माझ्यातल्या कवीचे शब्दही कमी पडतील त्याच्याबद्दल बोलायला! सगळंच कसं डोळ्यांसमोर अजूनही फेर धरतंय.