

Marathi Poetry Appreciation
esakal
शंतनु वेल्हाळ
मराठी कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक स्मृतीचा, भावविश्वाचा आणि संघर्षांचा दस्तावेज आहे. कवितेकडे पहिलं पाऊल टाकताना भीती वाटू शकते, पण ती भीती लवकरच आपुलकीत बदलते. कविता निवडताना ‘योग्य’ किंवा ‘अयोग्य’ असा निकष नसतो. जी कविता तुमच्याशी बोलते, तुम्हाला काही क्षण थांबवते, विचार करायला लावते तीच तुमच्यासाठी योग्य!
‘वेडात मराठे वीर दौडले सात...’
कुसुमाग्रजांची ही ओळ आपण कित्येकदा ऐकलेली असते. कधी शाळेच्या पाठ्यपुस्तकात, कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात, तर कधी एखाद्या भाषणात. पण या ओळीचा केवळ उच्चार आणि तिचा अनुभव यात मोठा फरक आहे. कविता फक्त वाचायची नसते, ती जगायची असते. आणि नेमकं इथंच अनेकजण अडखळतात. ‘कुठून सुरू करावं?’, ‘कोणत्या कवीला वाचावं?’, ‘कविता समजत नाहीत!’ अशा प्रश्नवजा समस्या आपण वारंवार ऐकत असतो.
मराठी कवितेचा पट फार व्यापक आहे. भक्ती, निसर्ग, प्रेम, क्रांती, अस्तित्व, शहर, गाव, स्त्री-अनुभव, दलित अस्मिता, आधुनिक मनाची घुसमट असे असंख्य रंग तिच्यात मिसळलेले आहेत. या विविधतेमुळेच नव्या वाचकाचा गोंधळ उडू शकतो. परंतु हा गोंधळ हीच एक सुरुवात असू शकते, कारण शोध घेण्याची ऊर्मी इथंच जन्माला येते.
कविता गद्यापेक्षा वेगळी असते. कथेत किंवा कादंबरीत कथानक आपल्याला हात धरून पुढे नेतं. कवितेत मात्र शब्दांच्या आड दडलेली शांतता वाचावी लागते. म्हणूनच कविता वाचताना घाई करणं उपयोगाचं नसतं. एखादी कविता दोन-तीन वेळा वाचावी लागते; कधी मोठ्यानं उच्चारून, कधी शांतपणे. कवितेतली प्रतिमा, रूपक, लय आणि विरामचिन्हंदेखील अर्थ घडवतात. एखाद्या ठिकाणी आलेला अल्पविराम किंवा पूर्णविरामही भावनेचा उतार-चढाव दाखवतो. नव्या वाचकानं प्रथम स्वतःच्या मनःस्थितीला ओळखणं आवश्यक आहे. आपल्याला कोणत्या प्रकारच्या भावना भिडतात? काय आवडतं? निसर्ग? प्रेम? समाजप्रश्न? अस्तित्वाचे प्रश्न? यावरून निवड सोपी होते.