सनील गाडेकर
कमी होणारे गृहकर्जाचे दर, घरांची वाढती मागणी, बँकांकडून गृहकर्जासाठी मिळणारे सहकार्य, सरकारची घरखरेदीला पूरक धोरणं, स्टॅम्प ड्युटीतील सवलती अशा सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्र आज पुन्हा एकदा तेजीच्या मार्गावर आहे. प्रत्येक वर्षी या क्षेत्रातील उलाढाल वाढत असल्याचे दिसत आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त राज्यातील बांधकाम क्षेत्राच्या विकासावर टाकलेला दृष्टिक्षेप...
कोविड-१९च्या उद्रेकाने सर्वच उद्योगधंद्यांप्रमाणे बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका दिला होता. मात्र त्यानंतर म्हणजे २०२०पासून २०२४पर्यंतच्या चार वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय बदल घडून आले आहेत. एकेकाळी अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेले बांधकाम क्षेत्र आज नव्या शक्यता, संधी आणि तंत्रज्ञानाच्या आधारे झपाट्याने विस्तारत असल्याचे दिसत आहे.