

Recipe of Love Book
esakal
स्नेहल आर. सिंग
Recipe of Love हे परिपूर्णतेचा दावा करणारं पुस्तक नाही. ते प्रामाणिकतेचा अनुभव देणारं पुस्तक आहे. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट झाली, हे पुस्तक माझं नाही; मी या पुस्तकाची लेखिका नाही, तर एक माध्यम आहे. एक ‘स्क्राइब’. एक अशी व्यक्ती, जिच्यामार्फत हा संदेश पुढं आला. म्हणूनच या पुस्तकाचं खरं स्वरूप आहे ‘Not mine, but ours.’ हे पुस्तक त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे, ज्याला या शब्दांमध्ये कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. ज्याला हे वाचताना केवळ माहिती नाही, तर अनुभव मिळतो.
कधीकधी काही गोष्टी आपण करत नाही, तर त्या आपल्याकडून घडतात. Recipe of Love हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव होता. हे पुस्तक मी लिहिलं, असं म्हणणं पूर्णपणे खरं ठरणार नाही. कारण या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ‘मी’ हा केंद्रबिंदू नसून, मी फक्त एक माध्यम होते. या प्रवासाची सुरूवात एका साध्या रायटर्स क्लबच्या भेटीत झाली. त्या दिवशी काही विशेष घडेल, असं अपेक्षितच नव्हतं. आम्ही नेहमीप्रमाणं लिहायला बसलो होतो. त्या संध्याकाळी वातावरणात एक वेगळीच शांतता होती. एक स्थिरता, जिथे शब्द येण्याआधीच काहीतरी वेगळं जाणवत होतं. मी काही क्षण डोळे मिटले आणि त्या क्षणापासून अनुभव बदलला.