

Stray dog problem India
esakal
श्वा नांच्या वाढत्या त्रासाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकांची संख्या पाहून थेट न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला. ‘माणसांच्या समस्येपेक्षा जास्त याचिका श्वानांच्या समस्यांबद्दल आल्या आहेत,’ असे त्यांनी सांगितले. गेले काही महिने सर्वोच्च न्यायालयात श्वानांसंबंधी विविध याचिका दाखल झाल्या होत्या. काही याचिकांवर न्यायालयाने निर्णयदेखील दिले आहेत. प्रश्न आहे तो या याचिकांचा नाही, तर श्वान या इमानदार प्राण्याचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांचा.
श्वानांना आपल्या जीवनशैलीत खूप महत्त्व आहे. घराचे रक्षण करणाऱ्या व मानवाचा मित्र असलेल्या या प्राण्यासंबंधीच्या काही बाबींमुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. भटक्या श्वानांनी चावे घेतल्याने अनेक लहान मुले मृत्युमुखी पडली आहेत. काहीजणांना मोठे शारीरिक अपंगत्व आले आहे. न्यायालयाने अनेक न्यायाधीशांनाही याचा उपद्रव झाला असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ‘पेटा’ किंवा अन्य प्राणीप्रेमी संघटना श्वानांच्या बाबतीत कुठलाही कठोर कायदा करायला विरोधच करत असल्याने देशभर या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.