

Rivers in Indian Civilization
esakal
डॉ. सुमंत पांडे
भारतातील सभ्यता राजप्रासादांत जन्मली नाही; ती नद्यांच्या काठावर फुलली. सिंधूने या देशाला नाव दिले, गंगेने उत्तर भारताची संस्कृती घडवली, गोदावरीने दक्षिणेतील अध्यात्म समृद्ध केले, कृष्णेने स्वराज्याची स्वप्ने जोपासली, नर्मदेने उत्तर आणि दक्षिण भारताला जोडले, तर चंद्रभागेने भक्तीला लोकजीवनाची दिशा दिली. म्हणून भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर प्रथम नद्या समजून घ्याव्या लागतील.
सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा...
...
गोदी में खेलती हैं जिसकी हजारों नदियाँ
अल्लामा इकबाल यांनी १९०४मध्ये आपल्या देशाचे वर्णन करताना, ज्याच्या अंगाखांद्यावर हजारो बारमाही वाहणाऱ्या नद्या अस्तित्वात होत्या तो हिंदुस्तान जगात एकमेव आहे, असे म्हटले आहे. त्याच्या अनेक शतके आधी, म्हणजे सुमारे १२व्या शतकात संत नामदेवांनी लिहिले -
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।
जेव्हा नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ।।
जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ।।
एक कवी राष्ट्राच्या भूगोलात नदी पाहतो; दुसरा संत नदीत अनादि अध्यात्म पाहतो. या दोन काव्यप्रतिमा सांगतात, की भारतात नदी ही केवळ जलधारा नाही; ती संस्कृती, श्रद्धा आणि स्मृतीचा अखंड प्रवाह आहे.
ऋग्वेद निर्माण झाला तो सिंधू नदीच्या खोऱ्यातच, ऋग्वेदातील नदीसूक्त हे मानवजातीच्या इतिहासातील नद्यांना अर्पण केलेले सर्वात प्राचीन स्तोत्र मानले जाते. या सूक्तात नदीला अन्नदात्री, जीवनदात्री आणि समृद्धीची जननी मानून तिला वंदन केले आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषींना हे उमगले होते, की नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नव्हे; ती संपूर्ण सृष्टीला जोडणारी जीवनरेषा आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीने नदीचा उपभोग घेतला नाही; तिला मातृत्वाचा मान दिला. पुराणांमध्ये नर्मदेच्या दर्शनाला गंगेच्या स्नानाइतके पुण्य मानले गेले. या कथा केवळ श्रद्धेच्या नाहीत; त्या नदी आणि मानव यांच्यातील हजारो वर्षांच्या सहजीवनाच्या आहेत.