

Rukmini Tribal Mother Story
esakal
मनिषा राजन कडव, कल्याण, ठाणे
गोळी रुक्मिणीच्या खांद्यात घुसली. आईच्या खांद्यावरचे रक्त बघून लता किंचाळली. रुक्मिणीला भयंकर वेदना होत होत्या, पण ती डगमगली नाही की कोसळली नाही. तिने जखम झालेला खांदा घट्ट पकडला आणि समोर उभ्या दाढीवाल्याकडे पाहून म्हणाली, ‘‘आई जिवंत असेपर्यंत तिच्या लेकराला हात लावणारा अजून जन्माला यायचाय!’’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या दाट जंगलात वसलेला कोरंबी पाडा म्हणजे फक्त वीस-पंचवीस घरांचे आदिवासी गाव होते. पावसाळ्यात तर गावाचा जगाशी संपर्क तुटून जायचा. वीज नाही, मोबाईलला रेंज नाही, पक्के रस्ते नाहीत. मुबलक होतं ते फक्त जंगल आणि त्या जंगलात दडलेली अनेक रहस्ये नि कथा. गावात एक आख्यायिका पिढ्यान्पिढ्या सांगितली जायची... ‘जंगलातल्या काळ्या दरीत रात्री कधीही जाऊ नका. तिथे वाघापेक्षाही भयंकर काहीतरी फिरतं...’ गावातील म्हातारेकोतारे त्या गोष्टीवर विश्वास ठेवत. तरुण ही आख्यायिका हसण्यावारी न्यायचे, पण तिकडे फिरकायचे नाहीत. गावात एक व्यक्ती होती जिनं कधीच ही गोष्ट हसण्यावारी नेली नाही, ती म्हणजे रुक्मिणी. रुक्मिणी खरेतर एक धाडसी आदिवासी महिला होती. तिचा नवरा तीन वर्षांपूर्वी जंगलात बेपत्ता झाला होता. वाघाने नेला की माणसांनी मारला, हे आजवर कुणालाच कळले नव्हते. पोलिस आले, चौकशी झाली, पण फक्त रक्ताने माखलेला एक फेटा तेवढा सापडला. त्या दिवसापासून रुक्मिणीने भीतीशी मैत्री केली होती.
त्या रात्री आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. पावसाच्या धारांनी संपूर्ण जंगलात, गावात थैमान घातले होते. रुक्मिणी तिच्या बारा वर्षांच्या लेकीची, लताची वाट पाहत दारातच उभी होती. अचानक गावाच्या टोकावरून एक लहान मुलगा धावत आला... ‘‘रुक्मिणी ताईऽऽऽ ताई... लता कुठं दिसत नाहीये!’’ रुक्मिणीच्या हातातील मातीचे भांडे खाली पडले.
‘‘कुठं गेली?’’
‘‘शेळ्या शोधायला गेली होती... अजून परतली नाही.’’
रुक्मिणी क्षणाचाही विलंब न करता घरात गेली. तिने भिंतीला टेकलेला धारदार कोयता, बांबूची मशाल आणि कमरेला बांधायची दोरी घाईघाईने उचलली. गावकरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, ‘‘थांब! सकाळ होऊ दे! रात्री त्या जंगलात जाणं म्हणजे मृत्यूला बोलावणं!’’ रुक्मिणीने मागे वळून पाहिलेही नाही... ‘‘माझी मुलगी जंगलात आहे. माझ्यातली आई सूर्योदयाची वाट कशी पाहील!’’