आशिष कासोदेकर
धावपटूसाठी शूज म्हणजे केवळ पादत्राणं नव्हेत, तर ते त्याचा न बोलता साथ देणारा खरा सखा असतात. प्रत्येक पावलाला आधार देणारे, दुखापतींपासून वाचवणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे हे शूज, धावण्याच्या प्रवासातील एक अनुभवसंपन्न, निःशब्द साथीदार ठरतात.
धावणं सुरू करण्यापूर्वी अनेक गोष्टींची तयारी लागते. सर्वप्रथम लागते मनाची तयारी. स्वतःला वारंवार पटवून द्यावे लागते, ‘आज पहाटे लवकर उठून पुन्हा एकदा मी धावणार आहे.’ त्यानंतर येते शारीरिक तयारी.
वॉर्मअप. प्रत्येक स्नायू, प्रत्येक सांधा हलकेच जागा करावा लागतो, जणू त्याला सांगावं लागतं, ‘चल, सज्ज हो...’ पुढे येतात वेळेची गणितं. किती मिनिटांत किती किलोमीटर, कोणत्या गतीनं, कोणत्या अंतरावर ब्रेक... सगळं काळजीपूर्वक ठरवलेलं असतं. धावणं म्हणजे केवळ पळणं नसतं, ती एक नियोजनशिस्त असते. पण या साऱ्या तयारीत एक बाब सर्वांत अधिक मोलाची असते ती म्हणजे शूज.