डॉ. राहुल हांडे
सहजोबाई या भारतीय भक्ती आंदोलनातील अखेरच्या संत कवयित्री मानल्या जातात. उत्तर भारतीय भक्ती आंदोलनाचा प्रारंभ महायोगी गोरक्षनाथांपासून झाला आणि त्याचे अंतिम शिखर सहजोबाईंसारखी स्त्री संत झाली, हा भक्ती आंदोलनातील प्रबोधनाचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातील भक्ती आंदोलनात स्त्री-पुरुष समानतेचे असलेले केंद्रवर्ती सूत्र यामधून अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.
राम तजूं पै गुरु न विसांरु, गुरु के सम हरि को न निहारुं ।
हरि ने जन्म दिया जग माहीं, गुरु ने आवा गमन छुडाई ।।
चरणदास की शिष्य दृढ, सहजोबाई जान ।
ताकी दृढ गुरु भक्ति पर,जोगजीत कुर्बान ।।
एकवेळ मी रामाचा त्याग करू शकते, मात्र मला गुरूचे विस्मरण कदापि करता येणार नाही. मी गुरूकडे ज्या आत्मभावाने पाहू शकते, तसे कदाचित हरीकडेसुद्धा पाहू शकत नाही. याला कारण हरीने म्हणजे परमेश्वराने या जगात मला जन्म दिला असला, तरी जन्म मरणाच्या म्हणजे गमन-आगमनाच्या येरझाऱ्यांमधून गुरूने माझी कायमची सुटका केली आहे. अशी चरणदासांची दृढ शिष्या असलेली सहजोबाई आहे, हे जाणावे. अशा माझ्या गुरुभक्तीवर कबीरसाहेबांचे ‘जोगजीत’ रूपदेखील स्वतःला समर्पित करेल.