

Sahyadri Monsoon Travel
esakal
उमेश झिरपे
पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप विलक्षण खुलते. मात्र हवामान, घसरडे मार्ग आणि धुक्यामुळे योग्य नियोजन व सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. अतिसाहस, अतिरेक न करता आणि सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास जास्त आनंद घेता येऊ शकतो.
भारतामध्ये प्रामुख्याने हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू दिसून येतात. एप्रिल-मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसल्यानंतर सर्वांनाच ओढ लागते ती वर्षा ऋतूची. जून महिन्यात नैॡत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनचे वारे वाहू लागतात आणि भारताच्या वर आभाळात पावसाचे काळे ढग दाटून येतात. या ढगांना पोषक वातावरण मिळताच पाऊस पडण्यास सुरुवात होते. पहिल्या काही दिवसांतच सर्व डोंगररांगा, माळराने आणि जंगले हिरवाईने नटू लागतात. ओढे, नाले, धबधबे, नद्या ओसंडून वाहू लागतात, या सगळ्यामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखी उठून दिसते. महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री डोंगररांगेत पावसाळ्यादरम्यान अत्यंत आल्हाददायक वातावरण असते. हिरवाईने नटलेले डोंगर, त्यामध्ये दाटून येणारे ढग, फेसाळणारे धबधबे, थंड वातावरण हे अनुभवण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे गर्दीने तुडुंब भरलेली असतात. वर्षापर्यटनाचा एक भाग म्हणून अनेक लोक साहसी पर्यटनाकडेही वळतात. आपल्या जवळपासच्या डोंगरांवर, गडकोटांवर ट्रेकिंगसाठी जातात.