

Namdev’s Contribution to Marathi Literature
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांनी संस्कृत काव्याचा आणि व्याकरणाचा विचार करत त्यातील तत्त्वे, प्रमेये किती प्रमाणात आपण स्वीकारायची आणि कसे मुडपून घ्यायचे हे कर्म अतिकठीण असे होते; पण ते अभिजात, जन्मजात काव्याच्या प्रपातात संत नामदेवांनी सहजसाध्य करून दाखविले आणि मराठी संत साहित्याची वाट पुढच्या प्रवासासाठी मोकळी करून दिली हे त्यांचे कार्य निश्चितच अपूर्व आणि महान असे आहे.
संत नामदेवांचे काव्य अनेक गुणांनी, वैशिष्ट्यांनी युक्त असे आहे. काव्य म्हणून ते अतिशय महत्त्वाचे, श्रेष्ठ प्रतीचे आहे. आज आपण कवितेच्या ज्या अंगोपांगांची चर्चा करतो, अभ्यास करतो, त्यामागे आधुनिक काव्यशास्त्र, नवकाव्यशास्त्राची काही परिमाणे, गृहीतके आधाराला घेतो. तथापि, काव्याचा मूळ गुणधर्म पाहता अलंकार, वृत्त इत्यादी अंगांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यात आणखी एक भाग म्हणजे काव्यातील प्रतिमासृष्टी. या प्रतिमासृष्टीला समांतर अशी अंगे म्हणजे अलंकार. त्यातही उपमा (उपमेय, उपमान), रूपक असे काही अलंकार काव्यातील प्रतिमांना पूरक ठरतात. काव्यातील प्रतिमा हा अलीकडच्या काव्यात येणारा प्रकार असला, तरी त्याची मुळे शोधायला थेट आपल्याला नामदेवांच्या काव्यापर्यंत जावे लागते. आधुनिक काळात किंवा नवकाव्यात दिसणारी प्रतिमासृष्टी आपल्याला संत नामदेवांच्या त्या काळातल्या काव्यात सापडते. तेव्हा संत नामदेवांच्या काव्यातल्या प्रतिमासृष्टीचे स्वरूप काय आहे ते समजून घ्यावे लागते.