ग्लोबल महाराष्ट्र : संदीप वासलेकर
‘मूनशॉट चॅलेंज आपल्यासमोर अत्युच्च आव्हान ठेवते. हळूहळू होणाऱ्या सुधारणांऐवजी धाडकन होणारं परिवर्तन साध्य करू पाहतं. या ठिकाणी नेहमीच्या पठडीतला विचार करून चालत नाही तर पठडीबाहेरचा विचार करावा लागतो. जुने आधार तोडून पुढे जाणारं तंत्रज्ञान शोधावं लागतं. त्यासाठी मूळ संशोधनावर प्रचंड भर द्यावा लागतो.’
ही मुख्य संकल्पना मांडणाऱ्या संदीप वासलेकर यांच्या बीजभाषणाचा संपादित अंश...
सध्या आपण एका ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये राहत आहोत. स्मार्टफोनच्या माध्यमातून जग जणू आता आपल्या खिशातच आलं आहे. मुळात हा स्मार्टफोनदेखील गुंतागुंतीच्या सप्लाय चेनमधून वेगवेगळ्या देशांत तयार झाला आहे. आपण आशियातील देशांतून; अमेरिकेतून फळं आयात करतो, चीनमधील घटकांपासून तयार केलेली औषधं वापरतो, जर्मनी-दक्षिण कोरियातील तंत्रज्ञानातून तयार झालेल्या गाड्या वापरतो तेव्हा जग जणू आपल्या घरातच वस्तीला आल्यासारखं वाटतं. खरोखरच आपण एका ‘वैश्विक’ जगात राहत आहोत आणि वैश्विक जग आपल्यात राहू लागलं आहे.