

Sanjeev Kapoor Cooking Journey
esakal
श्रुती भागवत
स्वयंपाक ही केवळ रेसिपींची गोष्ट नाही, तर त्यामागे प्रयोग, कल्पकता आणि माणसांवरचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो, असं शेफ संजीव कपूर सांगतात. पाककलेत येण्यामागचा त्यांचा प्रवास, जगभरातील रेस्टॉरंट्स सुरू करतानाचे अनुभव, टीमवर्कचं महत्त्व, सतत नवे प्रयोग करण्याची वृत्ती, खाद्यविश्वातील रंजक किस्से यांबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...
पाककलेत तुम्हाला फारशी रूची नव्हती,
असं मी ऐकलंय, खरं आहे का?
लहानपणी हे माहीतच नव्हतं की जेवण तयार करणं यातही काही प्रोफेशन असू शकतं. घरी असताना आई कणकेचा गोळा खेळायला द्यायची, त्याच्याशी मी खेळायचो एवढाच माझा स्वयंपाकाशी संबंध होता. खेळ, संगीत, नाटक हे छंद असतात पण जेवण तयार करणं हादेखील छंद असू शकतो, हे माहीतच नव्हतं. लहानपणीच थोडीफार ओळख झाली असती, तर कदाचित कुकिंग हा माझा छंद असला असता.
मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं आणि तेच प्रोफेशन म्हणूनही निवडायचं होतं. जे आमच्या घरात, नातेवाइकांमध्ये, शेजारपाजाऱ्यांमध्ये, मित्रपरिवारात कोणीच केलं नसेल असं काहीतरी मला करायचं होतं. क्रिएटिव्ह काहीतरी करायचं होतं. त्यातूनच मी या क्षेत्राकडे वळलो. सुदैवाने माझ्या घरच्यांनी मला चांगला पाठिंबा दिला. ‘हा माझा वेडेपणा आहे’ असं कधीच त्यांना वाटलं नाही. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत जे जे काही वेगळं, हटके केलं आहे, त्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. प्रगतीच केली आहे. त्यामुळे घरचेही मला म्हणायचे, की तू ठरवलं आहेस ना तुला काय करायचं आहे. मग आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत.