

Sant Janabai Abhang
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
नामदेवांच्या घरी असलेल्या विठ्ठलभक्तीचा प्रभाव किंवा परिणाम जसा नामदेवांवर झाला तसाच तो त्यांच्या आधी जनाबाईवर झाला होता. एरवी जनाबाई त्यांच्या घरात गेली नसती तर हा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वावर झाला असता की नाही, याचे उत्तर नक्की देता येत नाही.
मराठी संतकाव्याच्या परंपरेत संत जनाबाई हे नाव अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यांनी केलेली काव्यनिर्मिती संतसाहित्यातच नव्हे, तर पुढील काळातसुद्धा जनमानासात तेवढीच स्थान मिळवणारी अशी ठरली आहे. विशेषतः मराठीत स्त्रीवादी साहित्याची चळवळ निर्माण झाली, त्या काळात महाराष्ट्रातील स्त्रीवादी लेखिकांनी ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध आणि त्याआधी संत जनाबाईंचे अभंग आपल्या अभिव्यक्तीसाठी आधाराला घेतल्याचे दिसून येते. विशेषतः ‘डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ।।’ यातील बंधमुक्त भूमिका, पारंपरिक जोखडांना झुगारणारी विचारधारा म्हणून या अभंगाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते.