सुजाता राऊत
कथासंग्रहात असलेल्या सर्व कथांची शीर्षके अत्यंत आकर्षक, कथेला न्याय देणारी आहेत. या प्रत्येक कथेच्या शेवटी कबीराचा एक समर्पक दोहा शब्दार्थांसह दिला आहे व अर्थही थोडक्यात विशद केला आहे. त्यामुळे एकेका चित्तवेधक गोष्टींतून दोह्यांकडे नेणारी सुंदर पायवाट तयार होते.
लहान मुलांचे मन ओल्या मातीसारखे असते. त्या मातीला आपण संस्कारांनी, सुंदर विचारांनी चांगला आकार देऊ शकतो. जीवनाकडे बघण्याची चांगली दृष्टी देणारे विचार मुलांच्या मनात लहान वयात सहजपणे पेरता येतात. कारण या वयात त्यांच्या मनाच्या मातीवर उमटलेले ठसे अमिट असतात.
कबीर या नावाचा भारतीय जनमानसावर खोल प्रभाव आहे. कबीराचे दोहे कालातीत असून आजच्या काळातही प्रेरणा देतात. अतिशय अर्थवाही, काव्यात्मक असलेले कबीराचे दोहे जीवनाचा अर्थ उलगडणारे, माणसाला उचित मार्ग दाखवणारे व समाजातील अनिष्ट रुढींच्या विरोधात उभे ठाकणारे आहेत. कबीराचे दोहे मानवी मनाचे उन्नयन करणारे आहेत. गोष्टींतून कबीर या पुस्तकात लेखिकेने संस्कारक्षम वयातील मुलांना समजेल अशारितीने दोह्यांचे महत्त्व सांगितले आहे.