

Sant Namdev Abhang
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेव हे मुळात कीर्तनकार असल्यामुळे गेय स्वरूपात त्यांच्या रचना येणे स्वाभाविक होते. शिवाय त्या काळाचा विचार करता पद्य स्वरूपात लोकसंवाद साधणे हेच एकमेव माध्यम असल्यामुळे त्यांना या सगळ्या प्रकारांची रुजुवात करणे महत्त्वाचे वाटत असावे. कारण पुढे त्यांची वाट चोखाळणारी एक मोठी परंपरा निर्माण होणार होती.
संत काव्याला अभंगांची देण संत नामदेवांनी दिली, हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या काव्यलेखनात जे प्रयोग केले, रचनेसंबंधी ज्या वेगळ्या प्रकारांची मांडणी केली, ते पाहता त्यांचे हे श्रेय महत्त्वाचे म्हणून मान्य करावेच लागते. त्यांच्या आधी अभंग हा काव्यप्रकार मराठी काव्यात रुजलेला नव्हता. असलाच तर ओवी हा काव्यरचनेचा प्रकार रुळला होता. पण नंतर मात्र संत नामदेवांनी अनेक प्रकारे काव्यात नावीन्य (रचनेच्या आणि आशयाच्या दृष्टीने) आणण्याचा प्रयत्न केला. त्यात अभंग हा छंद त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या काव्यातून मराठी काव्यात रुजवला. काही अभ्यासक अभंगाला वृत्त असेही म्हणतात. पण ते वृत्त नसून तो छंद आहे हेही तेवढेच खरे. संत नामदेवांच्या काव्याचा विचार केला, तर त्यांनी आपली सर्वच अभंगरचना अक्षरछंदात गायलेली आहे. मराठी काव्यातील अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी छंद मराठीच्या प्रारंभकाळापासूनच जन्माला आलेले आहेत, असे म्हणावे लागते. ‘संस्कृतात न प्राकृतात आढळणारी ही लगत्वाभेदातील छंदोरचना मराठीत आढळते. अगदी आरंभापासून आढळते ही गोष्ट चिंतनीय आहे,’ अशाप्रकारचे विधान माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) करतात (संदर्भ ः छंदोरचना, पान क्र. ५१४). याचाच अर्थ ही रचना अपभ्रंश स्वरूपात होती, असा आहे. संत नामदेवांच्या आधी अस्तित्वात असलेल्या लयबद्ध लोकगीतांतून या छंदाचा उगम झालेला असावा, असाही समज आहे. ओवी या छंदांचे दोन प्रकार पडतात. एक लोकगीतांची ओवी आणि दुसरी ग्रांथिक ओवी. ना. ग. जोशी यांच्या मतानुसार, ‘जात्यावरील ओव्या, गाळणकांडण करताना म्हणावयाच्या ओव्या आणि वारकऱ्यांचे अभंग यातील संबंध अभेदाचा आहे. ओवीचेच मालात्मक रूप ‘अभंग’ या नावाने ओळखले जाऊ लागले.’ (संदर्भ ः मराठी छंदोरचना, पान क्र. १२६) मुळात ओवी हा शब्द शक १०५१च्या सुमारास रचलेल्या ओवी या पद्यप्रकाराचा उल्लेख मानसोल्लास अथवा अभिलषितार्थचिंतामणी या ग्रंथात आढळतो. (संदर्भ ः श्रीनामदेवदर्शन, देवीसिंग चव्हाण, पान क्र. ३८८) याचा अर्थ ओवी हा शब्द संत साहित्याच्या कितीतरी आधीपासून काव्यात रुजलेला होता. पण या काळात अभंग हा शब्द उपरोक्त ग्रंथात कुठेही नव्हता. तर ओवी आणि अभंगाचे स्वरूप मुळात एकच मानले जायचे.
बाराव्या शतकाच्या आधी ओवीचे जे दोन प्रकारचे स्वरूप होते, त्यातल्या ग्रांथिक ओवीने संत साहित्यात स्थान मिळवले आणि आणि त्यातून अनेक संतांनी हा काव्यप्रकार आपला मानला. पुढे संत नामदेवांनी अभंगनिर्मिती केली आणि त्यानंतर संपूर्ण संतांनी हा छंद आपल्या निर्मितीसाठी वापरला. पुढे संत तुकाराम आणि त्यांच्यानंतरसुद्धा हा छंद संत काव्यात महत्त्वाचा म्हणून मनाला जाऊ लागला. आज आधुनिक काळातसुद्धा या छंदामध्ये काव्यनिर्मिती केली जात हेही दिसून येते. आजची अभंगात्मक काव्यनिर्मिती ६-६-६-४ अशा शब्दांची म्हणजे पहिल्या तीन चरणांत सहा अक्षरे आणि चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. यमक दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात साधले जाते. संत साहित्यातील अभंग आणि आधुनिक अभंग यांचे स्वरूप आशयाच्या दृष्टीने वेगळे असले, तरी रचनेच्या दृष्टीने समानच आहे हे दिसून येते. उदाहरणार्थ पुढील अभंग बघू या