

Marathi Narrative Poetry
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
ओघवती, वर्णनाकुल भाषाशैली, प्रसन्न शब्दसृष्टी हेही आख्यानक काव्याचे महत्त्वाचे गमक ठरते. संत नामदेवांच्या या रचनेची भाषाशैली ही या सर्व गुणांनी युक्त अशी आहे. आख्यानक काव्यात प्रसंगानुकुल असा रसपरिपोष असणे गरजेचे ठरते. यात रसांना व्यक्त होण्यासाठी अधिक वाव असतो. विशेषत: करुणरस, अद्भुतरस, शृंगाररस, वीररस इत्यादी महत्त्वाच्या रसांचा परिपोष संत नामदेवांच्या आख्यानक काव्यात झालेला आहे.
मराठी प्राचीन साहित्यातील आख्यानकाव्याचे अध्वर्यू म्हणून संत नामदेवांना श्रेय दिले जाते, त्यामागाची पार्श्वभूमी पाहणे महत्त्वाचे आहे. मराठीत त्यापूर्वी आख्यानकाव्याची परंपरा महानुभाव साहित्यातील काही कवींनी रूढ केल्याचे दिसून येते; पण महानुभाव कवींनी आख्यानकाव्याचा हा प्रयत्न संस्कृतकाव्याला समोर ठेवून केला होता. महानुभावांनी श्रीकृष्ण चरित्र समोर ठेवून या काव्यांची उभारणी केली होती. मग ते महादंबाच्या धावळ्यांपासून नरेंद्रांच्या रुक्मिणीस्वयंवरापर्यंतचा प्रवास हेच दर्शवतो. यात मग महानुभावी कवी म्हणून भास्करभट्ट बोरीकर, दामोदर पंडित आदींचाही विचार करावा लागतो. महानुभाव पंडितांना संस्कृत महाकाव्यांच्या संकेतांची, रचनाबंधांची जाण होती. त्यामुळे त्यांची आख्यानकाव्ये केवळ कथानिवेदनापर्यंत सीमित न राहता काव्याच्या सगळ्या शक्यता त्यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या रचनांमध्ये संस्कृतप्रचुरता, अलंकारप्रचुरता, कल्पनाविलास आणि पांडित्यपूर्ण मांडणी असल्याचे दिसून येते.