Premium|Sant Namdev Autobiography : संत नामदेवांचे आत्मचरित्र आणि मराठी संतसाहित्यातील अभिव्यक्तीची नवी परंपरा

Marathi Saint Literature : संत नामदेवांच्या अभंगांतील आत्माविष्कार, भक्ती आणि लौकिक अनुभवांचा संगम मराठी आत्मचरित्र लेखनाची पायाभरणी करतो. त्यांच्या साहित्याने वारकरी परंपरेला नवी दिशा आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती दिली.
Sant Namdev Autobiography

Sant Namdev Autobiography

esakal

Updated on

संत नामदेवांची आत्मचरित्र लेखनाची प्रज्ञा स्वयंसिद्ध होती. त्यावर पूर्वसुरींचे कोणतेही संस्कार नव्हते. तसे संस्कार असणेही अशक्यच होते. कारण अशा प्रकारची काव्यरचना आणि वारकरी पंथाची सुरुवात कोणीही केली नव्हती. चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलनामाचा गजर पहिल्यांदा त्यांनी सुरू केला, आणि या सगळ्या सामाजिक चौकटीत आपल्या जातीचा, स्थानाचा विसर पडू न देता त्यांनी केलेला आत्माविष्कार आणि लौकिक जगण्याचा तोल सहजपणे सांभाळला, हेही नाकारता येत नाही.

आत्माविष्कार ही कोणत्याही लेखनाची प्रेरणा असते. ती कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत कमी-अधिक फरकाने सारखीच असते. लिहिणारा आपल्या अनुभवांना, आपल्या साक्षात्कारांना (संत साहित्याच्याबाबतीत सांगायचे तर) मांडण्यासाठी लेखनाचा आधार घेत असतो. त्यातून मांडण्यात येणाऱ्या अनुभवांना विविध माध्यमांतून तपासत तो तो सर्जनशील कवी/लेखक आपली निर्मिती करीत असतो. या सगळ्यांत ‘सांगणे’ हे महत्त्वाचे असते. यालाच दुसऱ्या शब्दात प्रकटीकरण असेही म्हणता येईल. हे प्रकटीकरण मौखिक परंपरा ते लिखित माध्यम अशा प्रवासाने उभे राहिले आहे. याच दृष्टीने मराठी संत साहित्याचासुद्धा शोध घेता येईल.

मराठी किंवा इतरही भाषेच्या संत साहित्यात महत्त्वाची असते ती भक्ती किंवा आराधना, आणि ही भक्ती, आराधना कोणातरी आराध्याची असते. त्याच्या भक्तीसाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी आणि आपला आत्मोद्धार करण्यासाठी संतकवी निर्मिती करीत असतो, करीत आलेला आहे; पण या भक्तीकाव्यात एकच आराध्यदैवत असूनसुद्धा काही संत कवींनी आपल्या निर्मितीत आपले वेगळेपण जपले आहे. उदाहरणार्थ, तुकारामांची कविता अलौकिक अनुभवांपेक्षा लौकिक अनुभवांना आपल्या अभंगातून अधिक प्रभावीपणे मांडते. असा लौकिक अनुभव जेव्हा कवींच्या निर्मितीतून व्यक्त होतो, तेव्हा तो त्याच्या लौकिक जाणिवांच्या, अनुभूतीच्या अधिक जवळ जाणारा असतो. त्यातून तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सगळे लौकिक, व्यावहारिक अनुभव तो त्यासाठी हाताशी घेत त्यातून स्वतःचा असा एक वेगळा सूर लावत असतो. म्हणून ही कविता काहीशी आत्मचरित्रात्मक स्वरूपाशी नाते सांगणारी ठरते. यात वरवर भक्तीची भावना असतेच, पण त्या भावनेच्या मागे, तळाशी लौकिक अनुभवांचे प्रतल दिसत असते. महाभारतासारख्या महाकाव्याबाबतीतसुद्धा असेच म्हणता येईल. महाभारत हे तर जगाच्या पाठीवरील पहिले आत्मचरित्र (महर्षी व्यासांचे वा कुरुकुलाचे आत्मचरित्र) होय. आणि महाभारताची लेखनाची प्रेरणा पाहिली, तर या विधानाशी कुणीही असहमत होईल असे वाटत नाही. इतिहासाचार्य महाभारताकडे ‘भारतीय इतिहास लेखनाचा पहिला प्रयत्न’ अशा दृष्टीने पाहतात. कारण त्यांच्यासमोर ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ हे शीर्षक होते. हे खरे असले तरी त्या महाकाव्याची प्रेरणा आत्मचरित्र लेखनाची आहे, हे तेवढेच खरे. याउलट मराठीतील महानुभाव पंथातील महत्त्वाचा ग्रंथ लीळाचरित्र हा शुद्ध चरित्रग्रंथ आहे. यात म्हाइंभटाने चक्रधरस्वामींचे चरित्र मांडले आहे. या पार्श्वभूमीवर संत नामदेव यांनी आपले चरित्र म्हणजेच आत्मचरित्र त्यांच्या काही अभंगांतून मांडले आहे. त्यामुळे त्या अभंगांपुरत्या भागांचा म्हणजेच ‘श्रीनामदेव चरित्रा’चा विचार केला, तर ते रूढार्थाने संत नामदेवांचे आत्मचरित्र ठरते. त्या दृष्टीने ते मराठीतील पहिले आत्मचरित्रकार ठरतात. कारण त्यांच्या आधी कुणीही आपले आत्मचरित्र किंवा ‘स्व-चरित्र’ लिहिलेले नाही. म्हणूनच आत्मचरित्रकार हा त्यांच्या लेखनाचा एक पैलू आहे, हे सांगता येईल. त्यादृष्टीने त्यांचे हे आत्मचरित्र तपासून पाहता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com