

Sant Namdev Family Poetry
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
‘वाण लागला नाही तरी गुण लागतो’ अशी एक म्हण आहे. हा गुण संत नामदेवांच्या घराण्यात सगळ्याच बाया-माणसांना लागला होता. एवढ्या प्रमाणात एखाद्या घरातल्या माणसांनी काव्यनिर्मिती केली, हे चित्र कदाचित एखाददुसरे घर सोडले, तर संत नामदेवांच्या घराशिवाय संत काव्यात अन्यत्र कोठेही नाही, असे अनुमान काढावे लागते.
संत नामदेवांच्या घराण्यातील बहुतेकांनी किंवा सगळ्यांनीच काव्यनिर्मिती केली असल्याचे दिसून येते. संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा सोडले, तर अशी काव्यरचना एकाच घराण्यातील सगळ्यांनीच केल्याचे उदाहरण संत परंपरेत दिसत नाही. त्यामागच्या कारणांचा शोध घेतला, तर संत नामदेवांच्या आधीच्या सहा पिढ्या विठ्ठलभक्त म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या सहा पिढ्या म्हणजे यदुशेट - हरीशेट - गोपाळशेट - गोविंदशेट - नरहरशेट - दामाशेट या होत. संत नामदेव हे सातव्या पिढीतील. म्हणजे संत नामदेवांच्या मागे ही सहा पिढ्यांची पुण्याई आहे असे म्हटले, तर ते अतिशयोक्त ठरू नये. संत नामदेवांच्या आईला, गोणाईला संत नामदेवांची देहभान हरपून चाललेली विठ्ठलभक्ती फारशी आवडत नव्हती. त्यामागे कौटुंबिक कारणे होती आणि त्यातूनच गोणाईने वेळोवेळी विठ्ठलासमोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. आपल्या घरातला कर्ता मुलगा घरातल्या पिढीजात व्यवसायाकडे दुर्लक्ष करून असा विठ्ठलभक्तीत रममाण झाला आहे, ही गोष्ट आई गोणाई आणि त्यांची पत्नी राजाई या दोघींनाही न रुचणारी अशीच होती, हे आपण आधीच्या लेखांमध्येही पाहिले आहे. आपल्या शिवणकामाच्या व्यवसायाचा भार नीटपणे आपल्या खांद्यावर घेऊन सांसारिक बाबी आधी पूर्ण कराव्यात आणि मग फावल्या वेळात विठ्ठलभक्ती करावी अशीच इच्छा या दोघींची आणि त्यांचे वडील दामाशेटी यांचीही असावी. तत्कालीन समाजव्यवस्था पाहता त्यात काहीही गैर नव्हते. पण त्यांची विठ्ठलभक्ती किंवा विठ्ठलप्रेम एवढे अपार होते, की त्यापुढे त्यांनी आपल्या संसाराचीही तमा कधी बाळगली नाही. असे असले तरी त्यांच्या घराण्यात विठ्ठलभक्त नव्हते असे नाही. उलट त्या विठ्ठभक्तीतूनच इतरांनीही काव्यरचना केलेली दिसून येते. त्याकाळी काव्यरचनेचा उद्देशच मुळी भक्ती हाच होता.