

Sant Namdev Krishna Bhakti
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांची सगुण भक्ती होती आणि त्या सगुण भक्तीसाठी त्यांना कृष्णाच्या मनोहर रूपापेक्षा अन्य कोणतेही व्यक्तिमत्त्व भावणारे नव्हतेच. श्रीकृष्णाच्या सगुण, मनोहर रूपावर भाळून त्याचे गुणगान करण्याच्या दृष्टीने कृष्णकथेचा घाट तयार केला असावा. गोकुळातल्या कृष्णकथेत कृष्णाच्या शृंगारिक लीलांना अधिक वाव आहे. बहुतेक कवींनी त्याच्या जीवनातील हाच भाग निवडून लोकप्रिय रचना केलेल्या आहेत.
भा रतीय मानसिकतेचा आणि भक्तीपरंपरेचा विचार केला, तर राम, कृष्ण आणि शंकर या तीन दैवतांना भारतीय अधिक मानतात. महाराष्ट्रात बाराव्या शतकाच्या अगदी प्रारंभी स्थापन झालेल्या महानुभाव संप्रदायाचेही आराध्य दैवत कृष्ण हेच होते. नाथ संप्रदायात आलेले दैवत दत्तात्रेय हासुद्धा कृष्णाचाच अवतार मानला जात होता. ज्ञानेश्वरीतसुद्धा कृष्णभक्ती आहेच; पण वारकरी संप्रदायांची स्थापना विठ्ठलभक्तीच्या प्रेरणेतून झाली आहे. पुढे या भागवत धर्माचे किंवा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी हेच रूढ झाले. भागवत धर्माच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक संताच्या काव्यात विठ्ठलाशिवाय अन्य कोणत्याही दैवताला फारसे स्थान नाही. प्रसंगोपात्त त्यांनी इतर देवांची आराधना आपल्या काव्यातून केली असेल, पण त्यांच्या भक्तीच्या केंद्रस्थानी विठ्ठल हेच दैवत प्रधान होते.
वर ‘प्रसंगोपात्त’ असा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. याचा अर्थ विठ्ठलभक्तांना किंवा भागवत धर्मातील वारकऱ्यांना इतर दैवतांविषयी तिटकारा आहे किंवा ते देव निषिद्ध आहेत असे मात्र नाही. भारतीय परंपरेतील दशावतारी संकल्पनेत मूळ देव म्हणून विष्णू आहे, आणि विष्णूचे अवतार म्हणून इतर देव, म्हणजे प्रामुख्याने राम आणि कृष्ण ही दैवते मानली जातात. पंढरपूरचा विठ्ठल हा कृष्णाचेच एक रूप आहे असेही मानले जाते. वारकऱ्यांना वैष्णव असे संबोधतात. वैष्णव म्हणजे विष्णूची भक्ती, आराधना करणारे. त्या अर्थाने विठ्ठलाची आराधना, भक्ती म्हणजे त्या विष्णूचीच, पर्यायाने कृष्णाचीच भक्ती असाही अर्थ निघतो. तो तसा घेतात. मराठी संत परंपरेत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि तुकाराम या संतांनी कृष्णभक्तीपर काव्यरचना केलेल्या आहेत. याच भक्तीत राधा हेही व्यक्तिमत्त्व या कृष्णभक्तीचा एक भाग झालेले आहे. पण संत एकनाथांचा अपवाद सोडला तर इतर संतांनी कृष्णावर सुटे सुटे अभंग रचलेले आहेत. संत नामदेवांच्या अभंगगाथेत मात्र (शासकीय प्रत) बालक्रीडा विभाग १, २, ३ आणि श्रीकृष्णलीला असे एकूण २८६ (अ. क्र. ६ ते अ. क्र. २९२) एवढे अभंग श्रीकृष्ण चरित्र म्हणून संत नामदेवांनी रचलेले आहेत. या अभंगांच्या आधारे त्यांच्या काव्यातील कृष्णचरित्राचा मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते.