

Sant Namdev Literature
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेव केवळ कीर्तनकारच नव्हते, केवळ कवीच नव्हते, केवळ विठ्ठलभक्तच नव्हते, तर त्यापलीकडे ते हटयोगावर, योगविद्यांतील विविध क्रिया-प्रक्रियांवर, संकल्पनांवर, अलंकारशास्त्रावर, वैदिक वाङ्मयावर अधिकारवाणीने रचना करणारे, भाष्य करणारे प्रतिभासंपन्न असे कवी होते, हे मान्य करावे लागते. कारण संत साहित्यातील बहुतेक सर्वच प्रकारांवर त्यांनी केलेल्या रचना या सबंध संत साहित्याला आणि वारकरी चळवळीला दिशादर्शक होत्या.
म राठी संत साहित्यात किंवा काव्यात लोकानुनय, जनरुचीसंवाद किंवा सगुणभक्ती म्हणून बहुतेक संतांनी आपल्या रचना सोप्या (पण बाळबोध नव्हे), सर्वसामान्यांना समजेल अशा सध्या भाषेत रचण्याच्या सगळ्या शक्यता अजमावून त्यानुसार काव्यनिर्मिती केली. त्यांची रचना भक्त आणि परमेश्वर यांच्यातील संवाद साधणारी प्रामाणिक वाट होती. सगळ्या संतांनी हीच वाट स्वीकारून आपापल्या परीने परमेश्वराची आणि त्यातही विठ्ठलाची आराधना केली आहे; पण ही वाट निर्माण करताना बहुतेक संत प्रतिभासंपन्न असल्यामुळे त्यांनी सहज-साध्या रचनेतसुद्धा आपल्या प्रतिभेने काही रचना सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे निर्माण करून ठेवल्या. आपल्यातील काही अनाकलनीय प्रश्नांना, अनुभवांना हे संतकवी आपल्या प्रतिभाधर्माने काही अभिव्यक्ती, रचना करीत होते. या रचनांना समजून घेण्यासाठी, अर्थ लावण्यासाठी अभ्यासक धडपडत राहिले. या अशा प्रकारच्या रचना संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि संत नामदेव यांनी केलेल्या आहेत. याला अभ्यासक ‘कूट रचना’ असे संबोधू लागले. संत ज्ञानेश्वरांनंतर किंवा मुक्ताबाई-नामदेवांनंतर हीच परंपरा पुढील संतांनीसुद्धा चालवली. ज्ञानेश्वरांची ‘काट्याच्या अणीवर तीन गाव