

Sant Namdev literature
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांनी आपल्या काव्यात तत्कालीन सुभाषितांचा वापर यथार्थपणे केला आहे, हे विधान यापूर्वी आलेले आहेच. संत नामदेव हे भावकवी असल्यामुळे त्यांच्या पंक्तींकडे आधी ‘काव्य’ म्हणून पाहणे आणि त्या स्वीकारणे महत्त्वाचे वाटते. त्यातील काव्य हे अस्सल प्रतीचे असल्यामुळेच पावणे आठशे वर्षांनंतरसुद्धा त्यातील काव्य हे आजही तेवढे महत्त्वाचे आणि बावनकशी आहे हे मान्य करावेच लागते.संत नामदेवांनी काव्याच्या क्षेत्रात हाताळलेल्या विविध प्रकारांकडे पाहिले असता, त्यांच्या साहित्यामध्ये केवळ संख्यात्मक भरच नाही तर दर्जात्मक समृद्धीही दिसून येते. त्यांनी आपल्या काव्यातून वाङ्मयीन वैभव अत्यंत समृद्ध आणि प्रभावी रीतीने व्यक्त केले आहे. त्यांच्या काव्यातीलरसात्मकता आणि सुभाषितवजा भाषा यांमुळे सामान्य रसिक-वाचकांप्रमाणेच जाणकारसुद्धा प्रभावित झाल्याशिवाय राहत नाहीत. काव्यातील किंवा साहित्यातील सुभाषितवजा भाषा, जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनविषयक आदर्श या वैशिष्ट्यांचा विचार करता, तशाच प्रकारची सर्व वाङ्मयीन वैशिष्ट्ये जागतिक साहित्यातही आपल्याला आढळतात. मराठी संतकाव्यात तर या सर्वच वैशिष्ट्यांची प्रचिती आपल्याला येते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या काव्यात ही वैशिष्ट्ये वारंवार आढळतात, कारण या संतांनी आपले लेखन तत्कालीन बहुजनांच्या भाषेत केले. बहुजनांच्या ओठांवर असलेली भाषा, शब्द त्यांच्या काव्यात सहजपणे आले.