

Sant Namdev Ram Bhakti
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
संत नामदेवांची प्रकृती ही भावकवीची असल्यामुळे दीर्घ स्वरूपाच्या रचना त्यांच्या प्रकृतीत बसणाऱ्या नव्हत्या. तथापि, त्या स्वरूपाच्या काही खुणा त्यांच्या लेखनात जाणवतात. आत्मप्रत्यय किंवा आत्मानुभूती यांतून स्फुरलेले त्यांचे काव्य आहे. म्हणून त्यात जिवंतपणा, उत्कटता, वर्ण्य विषयासंबंधीचा आंतरिक जिव्हाळा आणि वाणीचा मनोज्ञ आविष्कार यामुळे त्यांचे काव्य मराठी संत साहित्याच्या उदयगिरीवर तेजाने तळपत होते.
संत नामदेवांच्या लेखनातून जशी विठ्ठलभक्ती ओथंबून वाहते, कृष्णभक्ती आपल्याला आकर्षून घेते, तशीच त्यांची श्रीरामभक्तीसुद्धा आपल्याला त्यांच्या सर्वसमावेशक भक्तिमार्गाची प्रचिती देते. वारकरी संप्रदायात संत नामदेव, संत एकनाथ आणि पुढे संत तुकाराम यांनी आपल्या काव्याद्वारे श्रीरामाची भक्ती केल्याचे निदर्शनास येते. या श्रीरामभक्तीची रुजवात भागवत धर्मात संत नामदेवांनी केली, त्या अर्थाने ते या भक्तिसंप्रदायाचे जनक ठरतात. म्हणूनच त्यांच्या श्रीरामभक्तीविषयी नव्याने विचार करणे महत्त्वाचे ठरते.
भारतीय मानसिकतेचा विचार केला, तर श्रीराम हा आदर्शपूजन असा देव म्हणून सर्वत्र पुजिला जातो. रामायणानुसार, ज्या काळात भारतीय समाजाला जीवनविषयक आदर्शांची गरज भासू लागली, त्या काळात प्रभू रामचंद्र जन्मला आहे. त्यांच्या आदर्शाने, त्यागाने, निष्ठेने, भक्तीने देव म्हणून ते सगळ्यांना पूजनीय ठरले. तथापि, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, देवत्वाचा प्रभाव दक्षिणेत आणि उत्तरेत अधिक प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर पंचवटी, सीताहरण या घटना या भूमीत घडल्यामुळे त्यांचा संदर्भ रामचरित्रात तेवढाच येतो. दक्षिणेत त्यांनी रावणाशी युद्धाची तयारी करण्यात आणि वानर सैन्याची जुळवाजुळव करण्यात काही काळ घालवला. त्यामुळे त्यांचे परमशिष्य (बिभीषण, सुग्रीव, अंगद, हनुमान आदी) दक्षिणेत झाल्याची उदाहरणे समोर आहेत; आणि उत्तरेत तर त्यांचा निवासच होता. अयोध्या या उत्तरस्थित नगरीचे राजे म्हणून ते अभिषिक्त राजे होते. तथापि, संपूर्ण भारतभर त्यांचे भक्त, उपासक उदयाला येत होतेच. महाराष्ट्रात समर्थ रामदासांच्या निमित्ताने रामभक्तीचा नव्याने उदय झाला. समर्थांचा पंथ वारकरी संप्रदायापेक्षा वेगळ्या मार्गाने जाणारा होता. तत्कालीन समाजाला यवनांच्या प्रभावाला प्रतिबंध बसावा म्हणून भक्तीसोबतच शक्तीची, सामर्थ्याचीही नितांत आवश्यकता आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून, प्रवृत्तीमार्गाच्या साक्षीने पटवून दिले. अर्थात समर्थांच्या या रामदासी पंथांचा प्रभाव त्यांच्यानंतर लयास गेला हा भाग अलाहिदा. पण वारकरी संप्रदाय मात्र त्याच गतीने पुढे पुढे मार्गक्रमण करीत राहिला. अर्थात हा सगळा भाग संत नामदेवांच्या नंतर अडीचशे वर्षानंतरचा आहे. म्हणून श्रीरामभक्तीचेसुद्धा वारकरी संप्रदायात अध्वर्यूत्व द्यायचे झाले, तर ते संत नामदेवांनाच द्यावे लागेल. आणखी एक बाब या संदर्भात नोंदविणे गरजेचे आहे. ती म्हणजे संत नामदेवांनी शतकोटी अभंगांची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला होता, तो वाल्मीकींच्या शतकोटी रामायणाच्या धर्तीवर होता (पुढे संतश्रेष्ठ तुकारामांनी अंगिकारला), हाही संदर्भ समजून घेणे महत्त्वाचे वाटते.