

Famous Pedha in Maharashtra
esakal
सिद्धार्थ लाटकर
साताऱ्याची चर्चा करताना, एक गोष्ट अजिबात वगळता येत नाही ती म्हणजे सातारी कंदी पेढा! गेल्या १५० वर्षांहून अधिक काळापासून साताऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा एक आधारस्तंभ असलेला हा पेढा म्हणजे फक्त मिठाई नाही, तर सातारकरांची अस्मिता आणि परंपरेचं प्रतीक आहे. हे वैभव निर्माण केलं ते मोदी आणि लाटकर या दोन कुटुंबांनी. त्यांनी केवळ स्वतःचं नाव कमावलं नाही, तर अनेक कुटुंबांना रोजगार देऊन त्यांना उभं केलं. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही कला त्यांनी जोपासली, वाढवली, सातारकरांची मनोभावे सेवा केली आणि उत्कृष्ट दर्जाचा पेढा ग्राहकांपर्यंत पोहोचवला.
सातारचा कंदी पेढा कसा तयार झाला, याची एक मनोरंजक गोष्ट सांगितली जाते. देशात ब्रिटिश राजवट सुरू होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावरदेखील ब्रिटिश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती, त्यामुळे ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे. सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांचं उपजीविकेचं मुख्य साधन म्हणजे त्यांचं पशुधन. तिथल्या गायी, म्हशींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथं नव्हता. यामुळे त्यांचं दूध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दूध जवळचं मोठं शहर म्हणून साताऱ्याला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गूळ घातला. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे केले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटिश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना ‘करंडी’ म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला ‘कँडी’ म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी ‘कंदी’ केलं. हाच तो कंदी पेढा!