Premium|Saurabh Gadgil PNG Jewellers Interview : 'पीएनजी ज्वेलर्स'चा यशाचा फॉर्म्युला; सौरभ गाडगीळ यांनी उलगडले परंपरा आणि आधुनिकतेचे नाते

Balancing Tradition and Modernity in Business : पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांनी दागिन्यांच्या व्यवसायातील विश्वासार्हतेची हमी, बदलती फॅशन आणि नवीन पिढीच्या डिजिटल अपेक्षांनुसार ब्रँडिंगच्या धोरणात केलेल्या आधुनिक बदलांचा उलगडा करणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण संवाद.
Saurabh Gadgil PNG Jewellers Interview

Saurabh Gadgil PNG Jewellers Interview

esakal

Updated on

परंपरेचा मजबूत पाया, बदलत्या काळाची जाण आणि ग्राहकांच्या विश्‍वासाला केंद्रस्थानी ठेवत पीएनजी ज्वेलर्सने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ब्रँडिंग म्हणजे केवळ जाहिरात नाही, तर भावना, अनुभव आणि पिढ्यान्‌पिढ्या जपले जाणारे नाते आहे. वारसा आणि आधुनिकतेचा समतोल कसा साधला, हे सांगताहेत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ...

प्रश्न : दागिन्यांसारख्या अत्यंत व्यक्तिगत आणि सौंदर्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रात ब्रँडची एक विशिष्ट ‘स्टाइल’ असते. काळानुसार बदलणारी फॅशन आणि ब्रँडची मूळ सिग्नेचर स्टाइल यांचा मेळ घालताना ब्रँडची ओळख कशी जपली जाते?

सौरभ गाडगीळ ः दागिन्यांसारख्या वैयक्तिक आणि सौंदर्याशी निगडित असलेल्या क्षेत्रात प्रत्येक ब्रँडची एक स्वतंत्र ‘सिग्नेचर स्टाइल’ असते आणि तीच त्याची ओळख ठरते. काळानुसार फॅशन आणि ग्राहकांच्या अपेक्षा बदलतात, हे लक्षात घेऊन आम्ही मूळ मूल्यांना जपत डिझाईन्स आणि कलेक्शन्समध्ये सातत्याने नवकल्पना आणल्या आहेत. ब्रँडची खरी ओळख डिझाईनमध्ये नाही, तर ग्राहकांच्या विश्‍वासात असते. तो विश्‍वास कायम ठेवत बदल स्वीकारले, तरच ब्रँड अधिक मजबूत होतो.

प्रश्न : मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत ब्रँड म्हणजे केवळ जाहिरात नसून ती एक ‘हमी’ असते. ही अमूर्त हमी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असताना ब्रँडिंगच्या धोरणात कोणते बदल करावे लागतात?

सौरभ गाडगीळ ः मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत ब्रँड ही केवळ जाहिरात नसून ती विश्‍वासाची हमी असते. दागिन्यांच्या व्यवसायात ग्राहक फक्त सोने, हिरे किंवा चांदी खरेदी करत नाही, तर शुद्धता, पारदर्शकता, प्रामाणिक व्यवहार, भावनिक नाते आणि पिढ्यान्‌पिढ्या टिकणारा विश्‍वास स्वीकारत असतो. हा विश्‍वास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करताना ब्रँडिंगच्या दृष्टिकोनात काही महत्त्वाचे बदल स्वीकारावे लागतात. मूलभूत मूल्यांमध्ये सातत्य ठेवणे ही पहिली अट आहे. आमच्यासाठी विश्‍वास, शुद्धता आणि बांधिलकी ही तत्त्वे नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहेत. पूर्वी ग्राहकांचा विश्‍वास वैयक्तिक नातेसंबंधांवर उभा होता. त्या काळात ब्रँड म्हणजे दुकानामागची माणसे होती. आजही आम्ही त्या वारशाला तितक्याच आदराने पुढे नेत आहोत.

मात्र, नवीन पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आजचा ग्राहक अधिक जागरूक, माहितीपूर्ण आणि डिजिटल माध्यमांकडे झुकलेला आहे. त्याला केवळ नावावर विश्‍वास ठेवायचा नसतो, तर हॉलमार्किंग, बीआयएस प्रमाणपत्र, पारदर्शक दररचना, पुनर्खरेदीतील स्पष्टता, सुसंगत रचना आणि अखंड सेवा अनुभव यांची अपेक्षा असते. आजचा तरुण ग्राहक मूल्यांमध्ये रुजलेला असला, तरी त्याचा दृष्टिकोन आधुनिक आहे. त्यामुळे वारसा जपत त्याच्याशी त्याच्या भाषेत संवाद साधणे गरजेचे ठरते. म्हणूनच समकालीन कलेक्शन्स, हलक्या वजनातील दागिने, दैनंदिन वापरासाठीचे पर्याय आणि लाइटस्टाइल बाय पीएनजीसारखा उपब्रॅंड सुरू केला. ब्रँडिंगमध्ये संवादाची माध्यमेही बदलली आहेत. पूर्वी मुखोद्‍गत प्रसिद्धी आणि वैयक्तिक शिफारशींवर भर होता; आज विविध नव्या माध्यमांतून सातत्यपूर्ण आणि विश्‍वासार्ह संवाद साधणे आवश्यक झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com