निकिता कातकाडे
प्राणायाम म्हटलं की आपल्या मनात त्याची ओळख श्वसनाचा एक व्यायाम अशीच असते. मात्र, ही ओळख तेवढ्यापुरती निश्चितच मर्यादित नाही. प्राणायाम हा शब्द ‘प्राण’ आणि ‘आयाम’ या शब्दांपासून तयार झाला आहे. प्राण म्हणजे केवळ प्राणवायू नव्हे, तर जीवनशक्ती. आयाम म्हणजे ती शक्ती नियंत्रित करणे, वाढवणे.
आपण श्वास घेतो तेव्हा फक्त हवा नव्हे, तर प्राणशक्ती शरीरात प्रवेश करते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. श्वास तर आपण सतत घेत असतोच, पण विशिष्ट पद्धतीनं घेतलेला श्वास आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. प्राणायाम ही श्वसनाची शास्त्रीय पद्धत आहे. ठरावीक वेळी, विशिष्ट पद्धतीने आणि नियमितपणे केल्यास प्राणायामाचे शारीरिक आणि मानसिक लाभ नक्कीच अनुभवता येतात.