डॉ. सत्यजित सूर्यवंशी
आपल्या शरीराचे चैतन्य टिकविणारा आणि सतत कार्यरत राहणारा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. प्रत्येक श्वास आणि त्याबरोबर एका लयीत पडणाऱ्या प्रत्येक ठोक्याबरोबर हृदय आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. अशा या हृदयाची रचना कशी असते, त्याचे कार्य कसे चालते, तसेच हृदय आणि रक्तदाब याचा संबंध नेमका कसा आहे, याची शास्त्रीय माहिती देणारा हा लेखनप्रपंच...
हृदयाचे स्थान आपल्या छातीच्या पिंजऱ्यात असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. हृदय शरीरातील प्रत्येक पेशीला रक्तपुरवठा करते. त्यातून पेशींना प्राणवायू मिळतो. वेगवेगळ्या अवयवांच्या पेशींना दिवस-रात्र काम करण्याची ऊर्जा या प्राणवायूमधून मिळते. पण, फक्त शरीराचे रक्ताभिसरण करणारा एक अवयव इतकीच हृदयाची मर्यादित ओळख निश्चितच नाही.
निरोगी हृदय हा आपल्या सुदृढ शरीराचा भक्कम पाया असतो. त्याची व्यवस्थित निगा राखणे, काळजी घेणे ही खऱ्या अर्थी चांगले जीवन जगण्याची कला आहे. ही कला साध्य करणे, ती शिकणे यातून जीवनाचा आनंद घेता येतो.