

Nature Poetry
esakal
वनस्पतींवरच्या माझ्या स्वतःच्याच कवितांवर आधारित एक पाक्षिक सदर लिहायचा माझा मानस आहे. ज्या त्या ऋतूंमधल्या एखाद्या देखण्या वृक्षाविषयी, वनस्पती किंवा वेलीविषयी एक कविता, त्या वनस्पतीविषयी थोडीफार चर्चा किंवा माहिती, त्या कवितेमागची भूमिका आणि त्या कवितेमधल्या तुम्ही जाणून घ्याव्यात अशा मला वाटणाऱ्या काही गोष्टी उलगडून सांगणे असा प्रवास आपण करूयात.
नमस्कार! मी मंदार दातार. तुम्ही मला विचारलेत की माझा पोटापाण्याचा उद्योग काय, तर मी सांगेन मी संशोधक आहे. पुण्यातल्या आघारकर संशोधक संस्थेत वनस्पतिशास्त्रात संशोधन करतो. पण माझा मूळचा पिंड भटक्याचा. वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी हुंदडणे, हिंडत राहणे हे मी कायमच आवडीने केले आहे. पण वनस्पतींचा किडा चावण्यापूर्वी... काटा लागण्यापूर्वी म्हणू या हवे तर, मला मराठी साहित्याची शाळेत असल्यापासून खूपच आवड होती. मी शाळेत असताना बालभारतीच्या पुस्तकात असणाऱ्या कविता फारच अप्रतिम असायच्या. त्यातल्या त्यात कविता मला विशेष आवडायच्या. आजही बालभारतीच्या पुस्तकांतल्या कित्येक कविता मला अजून पाठ आहेत. त्यातूनच पुढे बरेच लोक तरुणपणात करतात तसे मीही कविता लिहायला लागलो. पण पुढे पुढे मला या कवितांनी इतके झपाटून टाकले, की कविता माझ्या व्यक्तित्त्वाचा महत्त्वाचा भाग कधी झाली ते लक्षातही आले नाही. पण स्वतःसाठी एक शिस्त म्हणून मी शक्यतोवर वृत्तबद्ध कविताच लिहायच्या असे ठरवत गेलो आणि त्यादृष्टीने प्रयत्न करत गेलो. त्यानिमित्ताने वृत्तांचा अभ्यास तर झालाच, पण वृत्तांच्या दिलेल्या चौकटीत पूर्वसुरींनी काय काय कमाल करून ठेवली आहे हेही जवळून पाहता आले. मग बाकीच्या इतर कवितांसोबत हळूहळू माझी आवडती झाडेही माझ्या कवितांमध्ये डोकावत राहिली. माझ्यातल्या वनस्पती अभ्यासकाला दिसणारे, न दिसणारे वनस्पतींचे अनेक पैलू माझ्या कवितेमधून येत राहिले. काहीवेळा काही खास वनस्पतींसाठी वेगळ्या कविता लिहून झाल्या. यूट्यूबसारख्या माध्यमांमधून त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि अनेक उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन गेल्या.