

आवडीच्या डिझर्टचा पहिला घास घेताक्षणी आपोआप डोळे मिटले जातात, त्या पहिल्या घासावर लक्ष केंद्रित होतं आणि असं वाटतं की सुख का काय ते हेच...! डिझर्टविश्वात फेरफटका मारताना डिझायर्ड डिझर्ट्सविषयी काही मजेशीर गोष्टी सापडल्या, त्यांचं कोलाज...
साखर ‘व्हाइट पॉइझन’ म्हणजेच ‘पांढरं विष’ होण्यापूर्वी काही हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा युरोपमध्ये तिची ओळख ‘पांढरं सोनं’ अशी होती. आता सर्वजण जिला हाताच्या अंतरावर ठेवतात, ती साखर गर्भश्रीमंतीचं लक्षण म्हणून मिरवायची तेव्हा! झालं असं, तिचा शोध लागला तेव्हा ती एवढी दुर्मीळ होती, की तिचं सेवन केवळ अतिश्रीमंत लोकांच्याच नशिबी असायचं. श्रीमंती दाखवण्यासाठी त्याकाळी म्हणे राजा-महाराजांच्या दरबारात शोपीस म्हणून साखरेचे ढीग रचले जात, तिच्यापासून वेगवेगळे प्राणी अन् पुतळे केले जात, देखावे केले जात... अर्थात त्याआधीही गोड पदार्थ केले जायचे, पण त्यासाठी मधाचा किंवा उसाच्या रसाचा वापर केला जाई, पण गुगल आणि जीपीटीबाबांच्या म्हणण्यानुसार मेजवानीतल्या पक्वांनांमध्ये साखरेचा वापर होऊ लागला तो श्रीमंतीच्या प्रदर्शनासाठीच.