डॉ. हिम्मतराव बावस्कर
अशिक्षित आई-वडिलांच्या घरात माझं बालपण गेलं. घरात शिक्षणाचा गंधही नव्हता. बालपण म्हणावं असं काही मिळालंच नाही. माळरानावरचं, दारिद्र्यात गेलेलं बालपण. तरीही, ज्ञान मिळवण्याची आस आणि जीवनात काहीतरी नवं सातत्याने करण्याची प्रखर जिद्द यामुळे अनेक व्याधी जडल्या.
‘जीवनात शिक्षा भोगून आलो, अंधार कोठडीतून प्रकाशाकडे वळलो म्हणूनच प्रकाशाची खरी किंमत कळली. ईश्वरकृपेने मिळालेली संजीवनी आणि वेळ मी दवडली, याबद्दल नियती मला माफ करणार नाही,’ हेच माझ्या जीवनाचं ब्रीदवाक्य आहे आणि माझ्या संशोधनामागे याच भावनेची प्रेरणा आहे. म्हणूनच मी सतत विविध वैद्यकीय व्याधींवर मूलभूत संशोधन करत आहे.