

Gen-Z Lifestyle Diseases
esakal
डॉ. वैशाली देशमुख
वैयक्तिक पातळीवर बदल घडवून आणायचे तर जेन-झीशी त्यांच्या पद्धतीनं प्रभावी संवाद साधण्याशिवाय पर्याय नाही. निरोगी जीवनशैलीचा आदर्श त्यांच्यासमोर कुणीतरी ठेवायला लागेल, आणि हे काम पालकांच्या पिढीवरच पडणार, नव्हे त्यांच्यासाठीही ते फायद्याचंच ठरेल. आणि निदान पुढच्या पिढ्यांना शहाणं करायचं असेल, तर जेन-झीकडून शिकून लहान वयापासून चांगल्या सवयी लावल्या तरच काहीतरी फरक पडेल, मुलं त्या जीवनशैलीला सरावतील. मग ती स्वीकारणं जमेल.
‘आजच्या पिढीची जीवनशैली त्यांना नैसर्गिकतेपासून आणि त्यामुळे आरोग्यापासून दूर नेणारी आहे,’ असं दीर्घायुष्यावर काम करणाऱ्या एका डॉक्टरांचं मत वाचनात आलं. जेन-झीच्या आहार, झोप, व्यायाम, स्क्रीनचा अतिवापर, सामाजिकीकरण, तणाव आणि मोकळ्या वेळाचा उपयोग अशा सगळ्या आघाड्या बिघडल्या आहेत; आणि त्यावर ते जे उपाय करतायत तेही कृत्रिमतेकडे जाणारे आहेत. आरोग्याविषयी ही पिढी जागरूक आहे असं आपण एकीकडे म्हणतो आहोत, मग त्याचवेळी हा विरोधाभास कसा दिसतो? त्यामागचं एक कारण म्हणजे मुलं आरोग्याविषयीची माहिती ऑनलाइन मिळवतात. त्यामध्ये शास्त्र-काट्यावर सिद्ध झालेले मार्ग फार कमी असतात. एखाद्या यूट्यूबरनं सांगितलं म्हणून आहाराची, वजन कमी करण्याची पद्धत योग्य असते, असं कसं होईल? तो त्यांचा वैयक्तिक अनुभव असेल, त्याव्यतिरिक्त इतरही काही पर्याय त्यांनी बरोबरीनं वापरले असतील. किंवा त्यांना हवी तेवढीच माहिती त्यांनी दिली असेल. पण मुलं आंधळेपणानं त्यांच्यामागे जातात. शिवाय मानसिक तणाव त्यांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम करतो. काहीवेळा ते व्यवस्थित व्यायाम करतातही, पण जंकफूड खाणं त्याला छेद देतं.