मंदार कुलकर्णी
पणजीत नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगात सुरू असलेल्या युद्धांच्या पडसादांबरोबरच आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ‘स्वतःचा शोध’. मोडकळीला आलेली कुटुंबव्यवस्था, तंत्रज्ञानाचा शिरकाव, माणूसपणाचा होत असलेला लोप, वाढणारे आर्थिक प्रश्न या सगळ्या काळात जगभरातली माणसं कशा पद्धतीनं स्वतःचा शोध घेत आहेत, तेही इफ्फीतल्या चित्रपटांमधून दिसलं.
एका हॉटेलमध्ये दोघेजण भेटतात. ती कुणाशी तरी लॅपटॉपवर करपल्लवी करत संवाद साधतेय. तोही तिच्याशी हातवारे करत बोलतो. दोघांनाही समोरची व्यक्ती मूकबधिर असल्याचं वाटतंय. हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.
कोणत्याही शाब्दिक संवादाविना प्रेमाचे धागे उलगडत असताना दोघांना समोरच्या व्यक्तीचं वास्तव कळतं. खरंच ऐकू येत नाही की मुद्दाम ऐकू येणं बंद केलंय हे कळत जातं. वास्तवाचे एकेक ‘बाँब’ आदळत जातात... आणि खऱ्या प्रेमाची परीक्षा सुरू होते...