

Senior Citizen Friendly Cities
esakal
डॉ. अमेय खरे
ज्येष्ठ व्यक्तीकडे अनेक दशकांचा कामाचा अनुभव, कौशल्य, सामाजिक संबंध आणि स्थानिक परिस्थितीचं ज्ञान असतं. अनेक ज्येष्ठ नागरिक घरातील मुलांची आणि नातवंडांची काळजी घेतात, सामाजिक संस्थांमध्ये काम करतात, धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात किंवा आपल्या अनुभवातून कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेण्यात मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना सक्षम ठेवणाऱ्या शहरात केलेली गुंतवणूक ही केवळ कल्याणकारी खर्च म्हणून पाहता येत नाही.
सकाळचे सात वाजले आहेत. पुण्यातील एका सोसायटीत राहणारं एक ज्येष्ठ दांपत्य घराबाहेर पडण्याची तयारी करत आहे. जवळच्या रुग्णालयात नियमित तपासणीसाठी जायचं आहे. रुग्णालय फारसं दूर नाही, पण घरातून बाहेर पडल्यापासून अनेक छोटे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. रस्त्यावरची पायवाट व्यवस्थित आहे का? रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागा आहे का? बसमध्ये सहज चढता येईल का? रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी किती चालावं लागेल? वगैरे... या प्रश्नांची उत्तरं तरुण व्यक्तीसाठी कदाचित क्षुल्लक असतील, पण वय वाढल्यानंतर याच छोट्या गोष्टी दैनंदिन जीवनाचा महत्त्वाच्या ठरतात.
आपण अनेकदा म्हणतो, की शहरात भरपूर सुविधा आहेत. चांगली रुग्णालयं, सार्वजनिक वाहतूक, उद्यानं, बाजारपेठा, बँका, डिजिटल सेवा आहेत. पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला आपण विसरतो - या सुविधा सर्वांसाठी सारख्याच प्रमाणात व सहज उपलब्ध आहेत का? हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा होत आहे. भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला, तरी देशाची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत चालली आहे. यूएनएफपीएच्या इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३नुसार, २०२२मध्ये भारतात ६० वर्षे आणि त्यापुढील वयाची लोकसंख्या सुमारे १४.९ कोटी आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे १०.५ टक्के आहे. २०५०पर्यंत हे प्रमाण २०.८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पुढील काही दशकांत भारतातल्या जवळपास प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल. त्यामुळे आपल्याला शहरांची रचना, सार्वजनिक सुविधा, आरोग्यव्यवस्था, वाहतूक आणि सामाजिक जीवन यांचाही नव्यानं विचार करावा लागणार आहे.