प्रसाद नामजोशी
एक दिवस बेरेनिझच्या स्वप्नात जेवियर बारडम हा प्रसिद्ध अभिनेता आला आणि तिला असं वाटलं की आपल्याला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळेल. सहाच महिन्यांत तिची स्कायफॉलसाठी निवड झाली आणि रॉल सिल्वाची भूमिका करायला तिचा सहकलाकार होता जेवियर बारडम! नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या बेरेनिझला बॉन्ड गर्लच्या शापावर विश्वास ठेवणं भाग पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली हे मात्र खरं!
जेम्स बॉन्ड आपल्या गुप्त कामगिरीवर असताना एखाद्या अतिशय सुंदर आणि रहस्यमय तरुणीला भेटतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते हे बॉन्डचा जन्मदाता इऑन फ्लेमिंगला अपेक्षित असं कथन आहे. तो ज्या सुंदर, मादक, धोकादायक आणि रहस्यमय तरुणीला भेटतो ती म्हणजे आपली बॉन्ड गर्ल. फ्लेमिंगच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये आणि म्हणून चित्रपटांमध्येही अशी रहस्यमय आणि सुंदर तरुणी बॉन्डला भेटत असे. मग त्यानंतरच्या काही चित्रपटांमध्ये ही तरुणी सुंदर, मादक आणि धोकादायक होती, पण रहस्यमय होतीच असं नाही.