

Indian Historical Monuments and Science
esakal
जवळचे शहर : दिल्ली
जवळचे विमानतळ : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
जवळचे रेल्वेस्थानक : दिल्ली जंक्शन
केव्हा जाल? : ऑक्टोबर ते मार्च
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : दिल्ली शहरात यमुना नदीच्या काठी वसलेला, एकेकाळी मुघलांची राजधानी असणारा हा किल्ला. हा किल्ला लाल वालुकाश्माचा वापर करून बांधला आहे. याच्या लाल रंगामुळेच या किल्ल्याला लाल किल्ला असे नाव मिळाले. मुघल बादशहा शहाजहानने आपली राजधानी आग्रा येथून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्यावर हा किल्ला बांधला गेला. किल्ल्याचे बांधकाम इ.स. १६३८ ते १६४८दरम्यान सुरू होते. ही वास्तू पर्शियन, तैमूरीद आणि हिंदू वास्तुकलेच्या परंपरांचा मिलाफ होऊन निर्माण झालेल्या ‘इंडो-इस्लामिक’ शैलीत बांधली आहे. येथे दीवान-ए-आम हे सभागृह आहे, जिथे बादशहा लोकांच्या तक्रारी ऐकत असे. दीवान-ए-खासमध्ये बादशहा महत्त्वाच्या मंत्र्यांशी आणि पाहुण्यांशी चर्चा करत असे. रंगमहाल आणि मुमताज महाल हे राण्यांचे आणि अंतःपुरातील स्त्रियांचे निवासस्थान होते. रंगमहाल त्याच्या छतावरील सोन्याच्या मुलाम्यासाठी आणि मध्यभागी असलेल्या संगमरवरी कमळाच्या कुंड्यासाठी प्रसिद्ध आहे. नहर-ए-बहिश्त म्हणजेच स्वर्गाचा कालवा हीदेखील आकर्षक स्थापत्यकृती आहे. किल्ल्यातील सर्व महत्त्वाचे कक्ष या कालव्याने जोडलेले होते, यामुळे किल्ल्याचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत असे. या किल्ल्याला दिल्ली दरवाजा आणि लाहोर दरवाजा अशी दोन मुख्य भव्य प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांवर सुबक नक्षीकाम केले आहे. तसेच इथे खास महाल, मोती मशीद, हयात बख़्श बाग अशा वास्तू पाहावयास मिळतात. या किल्ल्यात कोरलेल्या एका फारसी पंक्तीमध्ये म्हटले आहे, ‘पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असल्यास, ते येथे आहे, ते येथे आहे, ते येथे आहे.’