

Vaijayanta Marathi Film
esakal
सुलभा तेरणीकर
प्रदीर्घ काळानंतर आलेला शमा हा चित्रपट अनेक कारणांसाठी आकर्षण ठरला. या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण होतं सिंगिंग स्टार सुरैय्या. ही अभिनेत्री म्हणजे पन्नासच्या दशकातलं मोठं आकर्षण. रूप आणि स्वर यांची मेहेरनजर असलेली नायिका! गुलाम मुहम्मद यांचं संगीत आजही नक्कीच आठवतं! ‘आपसे प्यार हुआ जाता है’, ‘धड़कते दिल की तमन्ना’ या गाण्यांनी राज्य केलं त्यावेळी श्रोत्यांच्या मनावर...
जंगली, गंगा जमना, स्त्री असे काही अपवाद सोडले, तर कृष्णधवल चित्रपट नांदत होते. मराठी चित्रपटाची मंद समई रसिकांना सुखावत होती. पुणे, कोल्हापूर, मुंबई इथं मराठी चित्रपटांना पसंती मिळत होती. वैजयंता, सुवासिनी, रंग पंचमी, कलंक शोभा या चित्रपटांमुळे प्रेक्षक मराठी चित्रपटांची आणखी आतुरतेनं वाट पाहत होते. इकडे हिंदी सिनेसृष्टीत नव्या चेहऱ्यांची गर्दी होत होती. दिलीप-देव-राज यांच्या पुढे राज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर, शम्मी कपूर आपलं नशीब आजमावत होते. छोटे नवाब आर. डी. बर्मनही सिनेसृष्टीत आले होते. जयदेवसारखे अनुभवी संगीतकार हम दोनोमध्ये ‘अभी ना जाओ छोडकर’सारखं अजरामर गाणं देत होते. प्रेक्षकांची, सिनेसंगीताच्या रसिकांची नुसती तारांबळ उडाली होती...
रंगीत चित्रपटांनी रसिकांना आकर्षित केलं असलं, तरी खर्चिक रंगीत सिनेमा हे निर्मात्यांसाठी अजूनही स्वप्नच होतं. मराठी चित्रपटसृष्टीसाठी तर जणू मृगजळच होतं! अशा वेळी मराठी माणसं एका जिद्दीनं चित्रपट करत होती. गजानन जागीरदारांसारखा सिनेमात मुरलेला माणूस अण्णाभाऊ साठे यांच्या वैजयंता या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्यासाठी उभा राहिला होता. व्यंकटेश माडगूळकर पटकथा-संवाद लिहीत होते, तर गदिमा गीतं लिहीत होते. लावणी सम्राट संगीतकार वसंत पवार यांनी तर या चित्रपटाला आठेक गाणी देऊन लावणी, सवाल जवाब यांची लयलूट केली होती. त्यात सुरेख प्रेमगीतंही होती. जयश्री गडकर, लीला गांधी यांची नृत्यं प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडत होती.