

Short film
esakal
लघुपट हा दिग्दर्शकाच्या आतल्या प्रश्नांमधून जन्माला येतो. तो वैयक्तिक असतो. नवोदित दिग्दर्शकांसाठी हे माध्यम एका भक्कम पायासारखे आहे, जो त्यांना केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम करत नाही, तर मानवी स्वभावाचे पदर उलगडायलाही शिकवतो. लघुपट तयार करणे ही केवळ फिल्ममेकिंगची सुरुवात नाही, तर ती एक सिनेमाची भाषा समजून घेण्याची आणि स्वतःला शोधण्याची एक प्रोसेस आहे.
आज आपण अशा युगात आहोत, जिथे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या खिशात पोहोचले आहे. एका छोट्याशा स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगभरातील सिनेमे पाहू शकतो आणि तितक्याच सहजतेने स्वतःचा व्हिडिओ शूट करून जगासमोर मांडू शकतो. या सुलभतेमुळे आज प्रत्येकाला ‘दिग्दर्शक’ व्हायचे आहे, प्रत्येकाला आपली गोष्ट रुपेरी पडद्यावर मांडायची ओढ लागली आहे. मला आठवते, मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या स्मार्टफोनवर एक छोटासा सीन शूट केला होता, तेव्हा मला वाटले होते की फक्त ‘4K’ रिझोल्युशन असले की काम झाले. दोन-तीन शॉट्स एडिट करून जोडले, एक गोष्ट तयार केली, म्हणजे सिनेमा झाला. पण, कॅमेरा हाती असणे आणि सिनेमाची खरी समज असणे या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत.