मनोज अंबिके
आज अनेकांना, त्यांना मिळालेलं करिअर किंवा त्यांना मिळालेला मार्ग कदाचित चुकीचा वाटू शकेल. परंतु आज चुकीचा वाटणारा निर्णय उद्या मात्र वरदान ठरू शकेल. यासाठी मंत्र हाच, की आत्ता मला जे मिळालंय, आत्ता मी जे करतोय, आत्ता मला ज्या मार्गावरून जायचंय त्यात मी उत्कृष्ट होईन.
एका कार्यशाळेत मी पालकांना प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला काय आवडेल? तुमच्या मुलाचा शालेय परीक्षेत पहिला नंबर आलेला आवडेल की त्यानं जीवनात पहिला नंबर मिळवलेला तुम्हाला आवडेल? त्याच्या करिअरचा आलेख उंचावलेला बघायला आवडेल की त्याच्या जीवनाचा स्तर उंचावलेला तुम्हाला आवडेल? आणि वरील चारीपैकी एकाचीच निवड करायची झाली तर तुम्ही कशाची निवड कराल?’ मनन करण्याजोगा प्रश्न आहे हा.
आपला एक योग्य निर्णय आपल्याच काय, पण आपल्याबरोबर आपल्या परिवाराच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. काहींना हाच निर्णय, हेच करिअर कसं निवडायचं, हा प्रश्न फार गुंतागुंतीचा वाटतो. पण डोळसपणे या प्रक्रियेकडे पाहिलं, तर ही प्रक्रिया खूप साधी, सोपी आणि सरळ आहे. पण त्यासाठी मला नक्की काय हवंय हे मात्र कळलं पाहिजे.