ऋता अमोल सप्तर्षि
महाराष्ट्रातला नारळी भात असो, बंगालमधली भापा दोई आणि खिचुरी असो, ओरिसाचा पीठा असो, की दक्षिणेकडील गौरीपूजेचा नैवेद्य; श्रावणात सगळ्यांचा एक समान सूर गुंजतो, राज्य व भाषा फक्त नकाशावर वेगळ्या आहेत याची कायम जाणीव करून देतो. पावसाच्या प्रत्येक सरीत, वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत, गाण्याच्या प्रत्येक सुरात श्रावण मनात घोळत राहतो.
श्रावण महिना जसा आनंदाचा तसाच सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. दक्षिण भारतातल्या कन्याकुमारीपासून ते उत्तरेकडील काश्मीरपर्यंत सर्व राज्यांमध्ये आनंद, उत्साह, सृजन आणि पावित्र्य जपणारा महिना म्हणजेच श्रावण. ८-१५ दिवसांच्या फरकाने मागेपुढे चालणारा आणि राज्यान्वये वेगवेगळी नावे धारण करणारा हा श्रावण आनंद मात्र सर्वांना सारखाच देतो.