मधुरा संदीप लिमये
तू मन प्रसन्नही करतोस आणि विरहाची तीव्र भावनाही उत्पन्न करू शकतोस, हे कळलं तेव्हा गंमत वाटली. कधी धरित्रीला निळ्या आकाशदर्शनाची ओढ लावणारा, तर कधी मुग्धेप्रमाणे लपतछपत तिला भेटायला येणारा, तर कधी इंद्रधनूची केशभूषा करून प्रियकराच्या भेटीसाठी आतुर असलेला तू, ‘हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला’ या उपमेला अगदी तंतोतंत पात्र ठरतोस बघ!
प्रिय श्रावणा,
तू मला कायमच एका मराठी महिन्यापेक्षा माझा सखाच वाटत आलास. म्हणूनच तू जास्त जवळचा आहेस माझ्यासाठी. बघ ना, आषाढ मेघ बरसायचा तेव्हा शाळेत जायला नको वाटायचं. कारण दप्तर, कपडे सगळंच ओलंचिंब होऊन जायचं. पण मग जेव्हा तुझी चाहूल लागायची, तेव्हा पावसाचा जोर कमी व्हायचा अन् ऊन-पावसाची जुगलबंदी सुरू व्हायची. शाळेतल्या खिडकीतून दिसणाऱ्या इंद्रधनूची विलक्षण ओढ वाटायची तेव्हाच समजलं...
श्रावणा, तू अतिउत्तम चित्रकर्मी आहेस! ऊन-पावसाच्या लपंडावात तू एक चांगला मित्र आहेस, सृजनशीलतेनं परिपूर्ण असणारा, कविमनांना स्फूर्ती देणारा नायक आहेस तू! श्रावणा, बाहेरचा परिसर तर आषाढही हिरवागार करतो रे, पण तू मात्र अंतरंग समृद्ध करतोस बघ!