

Shravan Festivals and Maharashtra’s Cultural Traditions
esakal
अक्षय प्रभाकर वाटवे
नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावणी सोमवार, गोकुळाष्टमी, घरोघरी होणारे हळदीकुंकू अशी सण-उत्सवांची रेलचेल उसंत घेऊ देत नाही. शेतीच्या कामांना वेग आलेला असतोच. कोळीबांधव नारळी पौर्णिमेसाठी समुद्रपूजनाच्या लगबगीत असतात. बैलपोळ्याला सजवलेल्या बैलाच्या चकचकीत शिंगांची चमक शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसत असते. श्रावणातील सण-उत्सव आता आपल्याला नवे नसले, तरी त्यांची उत्सुकता आणि अप्रूप कायम असते.
‘हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा, घन गर्द स्मृतींचा भास पुन्हा...’ असे कवी वैभव जोशी म्हणतात. कवी
बा. भ. बोरकर म्हणतात, ‘समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा म्हैना!’ ही संपूर्ण कविता वेगळ्या संदर्भाने आली असली, तरी सृष्टीच्या सर्जनाच्या उत्सवाचे रूपक स्त्रीच्या रूपात रेखावे, हे अतिशय मोहक आणि लोभस आहे. कसा येतो हा श्रावण? कुसुमाग्रज म्हणतात, ‘तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला...’ आवेगाने कोसळणाऱ्या निळ्या घनांतून रिमझिम धारा बरसू लागल्या, की श्रावण सुरू झाला असे समजावे. आवरून-सवरून छान हिरवा शालू लेवून आलेल्या श्रावणमासात हर्ष मनात मावत नाही आणि क्षणात येते सरसर शिरवे अन् क्षणात फिरुनी ऊन पडू लागते. त्याच ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’, अशी तक्रार ना. धों. महानोर यांच्या कवितेतील नायिका नोंदवते.