

Shravanabelagola Marathi Inscription
pune
डॉ. नागनाथ बळते
श्रवणबेळगोळ येथील ‘श्री चावुण्डराजें करवियले’ हा शिलालेख मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा शिलालेखीय पुरावा आहे. ‘चावुण्डराजे’, ‘गंगराजे’, ‘सुत्ताले’ आणि ‘करवियले’ यांसारख्या शब्दरूपांतून तत्कालीन मराठीचे स्वरूप स्पष्ट होते. त्यामुळे हा शिलालेख केवळ ऐतिहासिक नोंद नसून मराठीच्या ऐतिहासिक व्याकरणाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा प्राथमिक स्रोत ठरतो.
गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या दोन्ही पायांच्या बाजूस शिल्पकाराने दगडी वारुळे निर्माण केलेली आहेत. त्यांपैकी डाव्या वारुळाची आतील बाजू आणि पुतळ्याचा डावा पाय यांच्यामध्ये मोठ्या कोनाड्यासारखी जागा निर्माण झालेली आहे. याच जागेत श्रवणबेळगोळचा प्रस्तुत शिलालेख कोरलेला आहे. गोमटेश्वराचा हा पुतळा दिगंबर जैनपंथीयांच्या ताब्यात असून, गावातच ‘भांडारबस्ती’ नावाचा प्राचीन जैन मठ आहे. या मठातून गोमटेश्वराच्या पूजेची व्यवस्था केली जाते. जैनेतरांना पुतळ्याला हात लावू दिला जात नाही; एवढेच नव्हे, तर पुतळ्याच्या बैठकीच्या दगडी कमळावरही पाय ठेवण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे पुतळ्याच्या पायथ्याशी कोरलेल्या लेखांचे वाचन दूर अंतरावरूनच करावे लागते.
या सर्व अडचणींवर मात करीत आजवरच्या अभ्यासकांनी या पुतळ्याचे आणि त्यावरील लेखांचे शक्य तितके सूक्ष्म अवलोकन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी पुतळ्याचे एक उत्कृष्ट छायाचित्र म्हैसूरचे अप्पुव्वू पिल्लै यांनी इ. स. १८८७मध्ये काढले होते, असे राइस सांगतात. स्वतः राइस यांचा बेळगोळ येथील शिलालेखांवरील ग्रंथ