

Smart Home for Seniors
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
आयुष्याची हेतुपूर्णतासुद्धा महत्त्वाची. ती यशस्वी वृद्धत्वाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आजारांचं प्रमाण कमी होतं, स्वतःची काळजी घेण्याची प्रेरणा वाढते आणि आरोग्यपूर्ण आहार व व्यायामाचं प्रमाण वाढवून असे लोक गुणवत्तापूर्ण आयुष्य आनंदानं जगू शकतात. त्यासाठी एआयचा सांगाती घ्यावा, पण स्वयंप्रेरणा मात्र आपली मानवी असावी! नित्य नवा दिवस आनंदाचा झाला, तर मग शेवटचा दिवससुद्धा गोडच होतो.
दहा वर्षांपूर्वी मी एका ‘स्मार्ट होम’ची म्हणजे ‘चुणचुणीत’ घराची जाहिरात वाचली होती. आशय होता, ‘आम्ही तुमच्या घरात स्मार्ट प्रॉडक्ट्स बसवू आणि तुमच्या आयुष्याला तरतरी आणू!’ म्हणजे काय, की घराच्या प्रवेशद्वाराला प्रवेश नियंत्रक कुलूप (एन्ट्री कंट्रोल सिस्टीम डोअर लॉक), गरजेनुसार घराचं तापमान सुयोग्य करणारी यंत्रणा, बदलत्या प्रकाशानुसार आपोआप वरखाली होणारे पडदे, घरभर बिनतारी महाजाल म्हणजे वायफाय आणि त्यावर चालणारी दूरध्वनी, स्मार्टफोन, टीव्ही, वॉशर यांसारखी अनेक उपकरणं; घरभर टेहळणी करणारे सुरक्षाचित्रक कॅमेरे, विविध खोल्यांत ठरावीक वेळी आपोआप चालू-बंद होणारे दिवे, तोंडची आज्ञा झेलून त्यानुसार कामं करणारी इलेक्ट्रॉनिक नोकराणी ॲलेक्सा किंवा गुगल होम, आपोआप झाडू-पोछा करणारा रोबो व्हॅक्युम, चुणचुणीत पलंग, चालकाविना चालणारी गाडी आणि काय काय... पूर्वी ज्या काही गोष्टी जादुई वाटत होत्या, त्या आज रोजच्या झाल्या आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वी नेस्ट, गुगल, स्लीप या कंपन्या, आणि त्यांच्याबरोबर विविध विद्यापीठांचे वार्धक्य संशोधन विभाग आणि रुग्ण विभाग संशोधन करत होते. त्यातल्या काही संशोधनांचं उपयोजन आता सुरू झालं आहे. यात घरची आघाडी, वैद्यकीय सुविधा हे प्रकार तर आपल्या आयुष्याची दोरी बळकट करत आहेतच, पण गुणवत्ताही वाढवत आहेत.