

Social Media Beauty Trends
esakal
स्वप्ना साने
हेअरफॉल कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठीची बरीचशी माहिती सोशल मीडियावर आहे. किती सहज हेअरफॉल थांबवता येऊ शकतो, हे रिल्समध्ये दाखवले जाते. ते बघून लगेच आपण त्यातली हेअरफॉल कंट्रोल किट मागवतो. ज्यात हेअर ऑइल, शाम्पू, कंडिशनर, हेअर सिरम हे सर्व छान पॅकिंगमध्ये असते. पण ते वापरल्यावर प्रत्यक्षात किती लोकांचे केस गळणे थांबले, हे एक कोडेच आहे. कारण हेअरफॉल होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात.
सौंदर्य प्रसाधनांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. कुठलाही विषय निवडला, तरी त्याबद्दलची माहिती आणि त्यासंबंधित व्हिडिओ बघायला मिळतात. स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, हेअर स्टाइल, लेटेस्ट ट्रेंड्स, सेलिब्रिटींच्या फॅशन, मेकअप, त्यांचे स्किन केअर रूटीन आणि इतर बऱ्याच गोष्टी. एकदा तुम्ही तो विषय सर्च केला, की तुम्हाला त्यासंबंधित वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ दिसतात. काहींचे व्हिडिओ आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतात, तर काही लोकांचे थोडे वेगळे वाटतात. काही माहिती वादग्रस्त वाटते. अशा व्हिडिओंमध्ये माहिती देणारा कितपत सज्ञान आहे, किती अनुभवी आहे, याबद्दल आपण जाणून घेत नाही.