प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी चाटची चटपटीत मजा अनुभवलेली असतेचं. मित्रांसोबत कट्ट्यावर, कॉलेजच्या गप्पांमध्ये, ऑफिसमधल्या ब्रेकमध्ये किंवा संध्याकाळी फेरफटका मारताना... चाट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कारण लागतच असं नाही; फक्त जबरदस्त इच्छा आणि बरोबर एकदोन मित्र-मैत्रिणी पुरेसे असतात! चटपटीत चव आणि आठवणी यांचे हे अनोखे नाते प्रत्येकाच्या मनात खास जागा निर्माण करते.
चाटप्रेमींच्या मनातल्या अशाच काही भन्नाट आठवणी...!
माझा आवडता चाट
लहानपणी आई-आजीसोबत सारसबागेत जाणं हा सुट्टीचा खास आनंद होता. गणपतीचं दर्शन, बंदुकीनी फुगे फोडणे, घोड्यावरची रपेट झाल्यावर शेवटी आमची पावलं थांबायची ती भेळेच्या गाडीजवळ. चुरमुरे, बुंदी, पापडी, कांदा, टोमॅटो, चिंच-गुळाचं पाणी आणि ठेचा यांचं भन्नाट मिश्रण म्हणजे ती खरी चटपटीत भेळ! मोठं झाल्यावर पिझ्झा-बर्गर आले तरी भेळेचं वेड कायम राहिलं.