

Stanford Palestine Protest
esakal
गोपाळ कुलकर्णी
वैश्विक संघर्षाने आज अवघ्या जगालाच कडेलोटावर आणून ठेवले आहे. एकीकडे अनिर्णीत युद्धांची मालिका आणि दुसरीकडे तापमानवाढीमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट अशा दुहेरी कात्रीत जग सापडले आहे. भविष्य हे असे अनिश्चिततेच्या खाईमध्ये पडले असताना तरुणाईला गप्प राहायला सांगणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्यासारखे आहे. अर्थात प्रस्थापित सत्ताधीशांनी कितीही गळचेपी केली, तरीही गप्प राहतील ते तरुण कसले? स्टॅनफर्डच्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये दिसलेले बहिष्काराचे चित्र प्रतिकात्मक होते. याआधीही पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावरून विविध विद्यापीठांत आंदोलनाचा वणवा पेटला होता, पण ट्रम्प प्रशासनाने तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
खरेतर युद्ध कोणत्याच समस्येवरचा उपाय असू शकत नाही, किंबहुना तो तसा असूही नये. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची अवघ्या जगाने मोजलेली किंमत किती भीषण आणि भयावह होती हे सर्वज्ञात आहे, तरीही परत जागतिक महासत्तांच्या खुमखुमीमुळे जग युद्धाच्या महासंकटात सापडले आहे. पॅलेस्टाइनमध्ये जे काही झाले, त्या विरोधात केवळ तरुणाईच नाही तर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी मैदानात उतरली होती. कलाकार, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण रोवले. अगदी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपासून ते थेट दिल्लीपर्यंत सर्वत्र आंदोलने झाली. प्रत्येक तरुण आपल्या मनातील खदखद व्यक्त करत होता. पॅलेस्टाइनला वाचवा, ही त्यांची मागणी होती. जगातील बड्या बहुराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील इस्राईलची गुंतवणूक लपून राहिलेली नाही. अगदी मस्क यांच्या टेस्लापासून पिचाई यांच्या गुगलपर्यंत सर्वत्र इस्रायली हस्तक्षेप स्पष्टपणे दिसून येत होता. स्टॅनफर्डच्या विद्यार्थ्यांनी नेमके हेच हेरले आणि पिचाई यांना कडवट विरोध केला.